‘एवढी सुंदर पत्नी असूनही डिप्रेशन कसं येतं?’ माजी क्रिकेटपटूचा विराट कोहलीला सवाल

‘एवढी सुंदर पत्नी असूनही डिप्रेशन कसं येतं?’ माजी क्रिकेटपटूचा विराट कोहलीला सवाल

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने नुकताच डिप्रेशनबाबत (Depression) खुलासा केला होता. माजी क्रिकेटपटू फारुक इंजिनियर (Farokh Engineer) यांनी या विषयावर विराटची फिरकी घेतली आहे.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) याने नुकताच डिप्रेशनबाबत (Depression) खुलासा केला होता. माजी क्रिकेटपटू फारुक इंजिनियर (Farokh Engineer) यांनी या विषयावर विराटची फिरकी घेतली आहे. ‘तुला (विराट) इतकी चांगली बायको असूनही डिप्रेशन कसं येतं?’ असा प्रश्न फारुख यांनी विचारला आहे. ‘स्पोर्ट्सकीडा’ या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी हा प्रश्न विचारला आहे.

फारुख विराटला उद्देशून म्हणाले की, ‘तू नुकताच बाबा बनला आहेस. तुझ्याकडे देवाचे आभार मानण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. डिप्रेशन ही पश्चिमेतील देशांमध्ये चर्चा होणारी गोष्ट आहे. तिथं याबाबत नेहमी बोललं जातं. भारतीयांमध्ये अशा परिस्थितीचा सामना करण्याची शक्ती असते. आपल्या आयुष्यातही अनेक चढ-उतार असतात. परंतु त्याच्याशी लढण्याची आपली मानसिक शक्ती असते, असं त्यांनी सांगितलं.

विराट कोहलीने 2014 साली आपल्याला डिप्रेशन आल्याचा खुलासा केला होता. त्यावर्षी विराटचं लग्न झालं नव्हतं. ही गोष्ट इंजिनियर यांच्या लक्षात आली नसावी, म्हणून त्यांनी हे मत मांडलं आहे. यापूर्वी या विषयाबद्दल जाहीर चर्चा केल्याबद्दल सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) विराटचं कौतुक केलं होतं.

विराटनं केला होता खुलासा

2014 सालच्या इंग्लंड दौऱ्यात बॅटिंगमध्ये वारंवार अपयशी ठरत असल्यामुळे मी तणावात होतो. डिप्रेशनमुळे आपण जगात एकटे पडलो आहोत, असं वाटत होतं, असं विराट कोहली म्हणाला होता. इंग्लडचे माजी क्रिकेटपटू मार्क निकोलस यांच्या नॉट जस्ट क्रिकेट या पॉडकास्टमध्ये विराटने हा खुलासा केला. या कठीण दौऱ्यादरम्यान मी एका कठीण टप्प्यातून गेलो, असंही विराटने यावेळी सांगितलं.

(वाचा : विराट कोहलीचा सहकारी जबरदस्त फॉर्मात, प्रतिस्पर्धी टीमची झोप उडवून बनला नंबर 1! )

त्यावेळी तू नैराश्याने ग्रस्त होतास का, असा प्रश्न विचारला असता, त्याने हो, होतो. असं उत्तर दिलं. तो म्हणाला, ‘आपण रन करू शकत नाही, याची जाणीव झाल्यानंतर मनाची चांगली स्थिती राहणं कठीण असतं पण, मला असं वाटतं की प्रत्येक बॅट्समन त्याच्या कारकीर्दीत अशा मानसिक स्थितीतून जातच असावा. त्या काळात कुठल्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या वागण्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही.’ असं विराटनं सांगितलं होतं.

Published by: News18 Desk
First published: February 28, 2021, 12:12 PM IST

ताज्या बातम्या