ब्रिस्टल 15 मे : पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या 5 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात बेअरस्टोच्या शतकाच्या जोरावर इंग्लंडने 6 विकेटने विजय मिळवला. या विजयासह त्यांनी मालिकेत 2-0 अशी आघाडीही घेतली. पाकिस्तानचा सलामीवीर इमाम उल हकची 151 धावांची विश्वविक्रमी खेळी व्यर्थ गेली. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 9 बाद 358 धावा केल्या. इंग्लंडचा सलामीवीर जॉनी बेअरस्टोला सामनावीर पुरस्कार मिळाला.
पाकिस्तानने दिलेल्या 359 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टो यांनी 105 चेंडूत 159 धावांची भागिदारी केली. जेसन रॉयने 55 चेंडूत 76 धावा केल्या. त्यानंतर बेअरस्टोने जो रूटसोबत 75 धावांची भागिदारी केली. बेअरस्टोला जुनैद खानने बाद करून इंग्लंडला दुसरा धक्का दिला. बेअरस्टोने 93 चेंडूत 15 चौकार आणि 5 षटकारांसह 128 धावा केल्या. त्यानंतर बेन स्टोक्सने 37 तर मोइन अलीने 46 धावा केल्या. रुट आणि स्टोक्स बाद झाल्यानंतर कर्णधार इयॉन मॉर्गन आणि मोइन अली यांनी 45 व्या षटकात संघाला विजय मिळवून दिला.
तत्पूर्वी, इंग्लंडने नाणेफेक जिंकून पाकिस्तानला फलंदाजीसाठी पाचारण केलं. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या पाकिस्तानचे दोन फलंदाज लवकर बाद झाले. इंग्लंडच्या क्रिस व्होक्सने फखर जमान आणि बाबर आजम यांना बाद केलं. दुसऱ्या बाजूने इमाम उल हकने शतकी खेळी साकार केली. सर्वात कमी डावात 6 शतक करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने 27 एकदिवसीय सामन्यात सहा शकते केली आहेत.
इमाम उल हकला हॅरिस सोहेल (41 धावा), कर्णधार सर्फराज अहमद (27 धावा)असिफ अली (52 धावा) यांनी साथ दिली. इमामने 131 चेंडूत 16 चौकार आणि एका षटकारासह 151 धावा केल्या. टॉम करनने त्याला बाद केले. इंग्लंडकडून गोलंदाज क्रिस व्होक्सने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. टॉम करनने दोन तर डेव्हिड विली आणि लियाम प्लंकेटने प्रत्येकी एक गडी बाद केला.
SPECIAL REPORT : 'मनसे फॅक्टर'मुळे अशोक चव्हाणांचा गड राहणार का अभेद्य?