मुंबई, 26 मे : ऐतिहासिक वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये (WTC Final) पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा विराट कोहलीच्या कॅप्टनसीवर (Virat Kohli) प्रश्न उपस्थित झाले आहेत. विराटच्या नेतृत्त्वाखाली सलग तिसऱ्या आयसीसी स्पर्धेत टीम इंडियाला विजेतेपद मिळवण्यात अपयश आलं आहे. यापूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 आणि क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मध्ये भारतीय टीमला विजेतेपद पटकावण्यात अपयश आले होते. यावर्षी टी20 वर्ल्ड कप होणार आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेटच्या सर्वात छोट्या प्रकारात विराटला कॅप्टन पदावरुन दूर करत रोहित शर्माकडं (Rohit Sharma) नेतृत्त्व द्यावं अशी मागणी आता होत आहे.
क्रिकेटच्या वेगळ्या प्रकारासाठी दोन स्वतंत्र कॅप्टन असावे अशी मागणी यापूर्वी देखील झाली आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये राष्ट्रीय टीमचे एकापेक्षा जास्त कॅप्टन आहेत. तर भारत, पाकिस्तान आणि न्यूझीलंड या तीन देशांमध्ये एकच कॅप्टन आहे. टीम इंडियानं देखील आता विराट कोहलीचं ओझं कमी करण्यासाठी आणखी एक कॅप्टनची नियुक्ती करावी असा अनेकांनी सल्ला दिला आहे.
इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू माँटी पानेसर (Monty Paneser) याने 'क्रिकबाऊन्सर'शी बातचित करताना रोहित शर्माला टी20 टीमचा कॅप्टन करण्याची मागणी केली आहे. “रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सची कॅप्टनसी चांगली केली आहे. तसंच विराट कोहली सध्या दबावात आहे. इंग्लंड विरुद्धची टेस्ट सीरिज आणि आगामी टी20 वर्ल्ड कपचा दबाव कोहलीवर आहे. टीम इंडियानं या दोन्ही स्पर्धेत चांगली कामगिरी केली नाही तर त्याचे परिणाम काय होतील हे तुम्हाला माहिती आहे.” असे पानेसरने सांगितले.
T20 मध्ये होणार सिक्सचा वर्षाव! युवराज, डीव्हिलियर्स आणि गेल खेळण्याच्या तयारीत
रोहित शर्माचा रेकॉर्ड
रोहित शर्मानं आयपीएल स्पर्धेतच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कॅप्टनसीची क्षमता दाखवली आहे. त्याच्या कॅप्टनसीमध्ये टीम इंडियानं 10 पैकी 8 वन-डे तर 19 पैकी 15 टी20 सामने जिंकले आहेत. आशिया कप आणि निदहास ट्रॉफी या दोन स्पर्धांचं विजेतेपद देखील रोहित शर्माच्या कॅप्टनसीखालीच भारतीय क्रिकेट टीमनं पटकावलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.