लंडन, 4 मे: इंग्लंडचा फास्ट बॉलर ओली रॉबिन्सन (Ollie Robinson) लॉर्ड्स टेस्टमध्ये पदार्पण केल्यानंतर वादात सापडला आहे. न्यूझीलंड विरुद्ध रॉबिन्सननं 75 रन देत 4 विकेट्स घतल्या. या चांगल्या कामगिरीनंतरही त्याची टीममधील जागा धोक्यात आली आहे. रॉबिन्सननं 8 वर्षांपूर्वी केलेल्या ट्विटमुळे त्याच्यावर जोरदार टीका होत आहे. त्याने आठ वर्षांपूर्वी वर्णद्वेषी आणि लिंगभेदी ट्विट केले होते. यामुळे त्याच्यावर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ECB) कारवाई करण्याची शक्यता आहे.
'द टेलीग्राफ' मधील वृत्तानुसार रॉबिन्सनला या प्रकरणामुळे भारताविरुद्धच्या मालिकेतून वगळले जाऊ शकते. ही ट्वीट एप्रिल 2012 आणि जून 2013 साली करण्यात आली होती, त्यावेळी रॉबिन्सनचं वय 18 वर्ष होतं. रॉबिन्सनने त्याच्या ट्वीटमध्ये एका धर्माच्या लोकांना दहशतवादाशी जोडले गेल्याचं दाखवण्यासाठी काही शब्दांचा वापर केला होता. एवढच नाही, तर त्याने आशियाई महिला आणि लोकांबाबतही अपमानकारक टिप्पणी केली होती. त्याच्या या ट्वीटवर आता लोक नाराजी व्यक्त करत आहेत.
रॉबिन्सननं मागितली माफी
न्यूझीलंडविरुद्धच्या (England vs New Zealand) लॉर्ड्स टेस्टचा पहिला दिवस संपल्यानंतर रॉबिन्सनने लगेचच या प्रकरणी माफी मागितली. माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या दिवशी मी 8 वर्षांपूर्वी केलेल्या वर्णभेदी आणि लिंगभेदी ट्वीटबाबत मला लाज वाटत आहे. मी वर्णभेदी किंवा लिंगभेदी नाही, हे मी स्पष्ट करू इच्छितो. 8 वर्षांपूर्वी केलेल्या या कृतीचा मला पसतावा झाला आहे. तसंच यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो. मी कोणताही विचार न करता, बेजबाबदारपणे वर्तणूक केली. या गोष्टी समजण्याइतकं माझं वयही तेव्हा नव्हतं. तरीही मी माफी मागतो, असं रॉबिन्सन म्हणाला.
आज माझ्या टेस्ट पदार्पणाविषयी बोललं गेलं पाहिजे होतं. माझी कामगिरी चर्चेचा विषय असली पाहिजे होती, पण भूतकाळात मी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याने यावर पाणी टाकलं. आयुष्यात बदल घडवण्यासाठी मी गेल्या काही वर्षांमध्ये खूप मेहनत घेतली. यामध्ये माझी काऊंटी टीम ससेक्स आणि इंग्लंडच्या टीमने खूप पाठिंबा दिला. एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून मला जे शिक्षण आणि समज गरजेची होती, ती मला मिळाली, अशी प्रतिक्रिया रॉबिन्सनने दिली.
दक्षिण आफ्रिका सोडणाऱ्या खेळाडूंची Playing 11, पाहा ‘ते’ सध्या काय करतात
इंग्लंडचे साहाय्यक बॅटींग कोच थोर्पे यांनी या प्रकरणावर बोलताना सांगितले की, 'त्याला ड्रेसिंग रुममध्ये माफी मागावी लागली. त्याचबरोबर त्याला जगासमोरही चुकीची कबुली देऊन माफी मागावी लागली. हे सर्व त्याच्यासाठी कठीण आहे. पण त्यानं चूक केल्याचं त्याला मान्य आहे.' लॉर्ड्स टेस्टमध्ये चांगली बॉलिंग केल्याबद्दल थोर्पेनं रॉबिन्सनची प्रशंसा केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.