सिडनी, १२ जानेवारी २०१९- टीव्ही शोमध्ये केलेल्या विवादास्पद वक्तव्यानंतर हार्दिक पांड्याचा आत्मविश्वास पूर्णपणे गेल्यासारखाच दिसत आहे. सिडनी क्रिकेट ग्राऊंडमध्ये त्याने चाहत्यांकडे एकदाही पाहिलं नाही. त्याचे चाहते त्याच्याकडे ऑटोग्राफ आणि सेल्फी मागत होते मात्र हार्दिकने त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं. हार्दिक मान खाली घालूनच चालत नेटपर्यंत गेला. तसं पाहायला गेलं तर हार्दिकला नेहमीच लाइम लाइटमध्ये राहायला आवडतं. त्याने ही गोष्ट कॉफी विथ करणमध्येही मान्य केली. मात्र या विवादानंतर हार्दिकची एक वेगळीच बाजू पाहायला मिळत आहे.
वादग्रस्त वक्तव्यामुळे हार्दिक पांड्या आणि केएल राहुलच्या करिअरमध्ये मोठं वादळ आलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांवर अनिश्चित काळासाठी बंदी घालण्यात येऊ शकते. प्रशासकीय समितीच्या (CoA) अध्यक्षा डायना इडुल्जी यांनी तपास पूर्ण होईपर्यंत दोघांवर बंदी कायम ठेवण्याची मागणी केली आहे. याआधी गुरुवारी सीओएचे प्रमुख विनोद राय यांनी हार्दिक आणि राहुलवर दोन एकदिवसीय सामन्यांची बंदी घालण्याची मागणी केली.
हार्दिकने कॉफी विथ करण या शोमध्ये महिलांबद्दल अपमानजनक गोष्टी बोलल्या होत्या. त्यांच्याबद्दल राय म्हणाले की, ‘पांड्या आणि राहुल दोघांनाही तपास पूर्ण होईपर्यंत निलंबीत करण्यात आलं आहे.’ असं म्हटलं जातं की, बीसीसीआयचा तपास पूर्ण व्हायला किमान १५ दिवस लागू शकता. दरम्यान, विराट कोहलीने दोन्ही खेळाडूंवरुन हात काढून घेतला आहे. विराट ऑस्ट्रेलियामध्ये पत्रकार परिषदेत म्हणाला की, ‘मी हे निश्चितपणे सांगू शकतो की, भारतीय क्रिकेट संघ आणि एक जबाबदार खेळाडू म्हणून आम्ही अशा पद्धतीच्या वागणुकीचं समर्धन करणार नाही. हे त्यांचं व्यक्तिगत मत होतं. दोन्ही खेळाडूंन त्यांचं काय चुकलं हे कळलं आहे आणि दोघांनाही या गोष्टीचं गांभीर्य कळलं आहे.’
VIDEO : भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर विरुष्कानं असं केलं सेलिब्रेशन