Home /News /sport /

IPL मध्ये मुंबईला मिळवून दिला ऐतिहासिक विजय, 29व्या वर्षी घेतली निवृत्ती

IPL मध्ये मुंबईला मिळवून दिला ऐतिहासिक विजय, 29व्या वर्षी घेतली निवृत्ती

आयपीएल (IPL) इतिहासात मुंबई (Mumbai Indians) ला रोमांचक आणि ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या क्रिकेटपटूने अवघ्या 29 व्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

    मुंबई, 5 डिसेंबर : न्यूझीलंडचा आक्रमक बॅट्समन कोरे अंडरसन (Corey Anderson) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. अंडरसन आता अमेरिकेमध्ये टी-20 लीग खेळणार आहे. मागच्या काही वर्षांपासून अंडरसनला दुखापतींनी ग्रासलं होतं. अंडरसन याची पत्नी अमेरिकेत राहते, त्यामुळे पत्नीच्या सांगण्यावरुनच त्याने न्यूझीलंडहून अमेरिकेला जायचं ठरवलं. येत्या काही दिवसांमध्ये अंडरसन अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळू शकतो. 29 वर्षांच्या अंडरसनने मुंबई आणि दिल्लीसाठी आयपीएल मॅचही खेळल्या. सगळ्यात जलद शतक 2013 साली पहिली आंतरराष्ट्रीय मॅच खेळणाऱ्या कोरे अंडरसनने आपल्या आक्रमक बॅटिंगने ओळख मिळवली होती. 2014 साली त्याने शाहिद आफ्रिदीचं 18 वर्ष जुनं रेकॉर्ड मोडलं होतं. अंडरसनने वेस्ट इंडिजविरुद्ध फक्त 36 बॉलमध्ये शतक ठोकत, सगळ्यात जलद शतक करण्याचा विक्रम केला होता. अंडरसनने 131 रनच्या खेळीमध्ये 14 सिक्स लगावले होते. याआधी आफ्रिदीने 1996 साली 37 बॉलमध्ये शतक केलं होतं. 2015 साली अंडरसनचं हे रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सने मोडलं. वेस्ट इंडिजविरुद्ध एबी डिव्हिलियर्सने 31 बॉलमध्ये शतक केलं होतं. कोरे अंडरसनने न्यूझीलंडकडून 13 टेस्ट, 49 वनडे आणि 31 टी-20 खेळल्या. टेस्ट आणि वनडेमध्ये कोरे अंडरसनच्या नावावर एक-एक शतक आहे. अंडरसनने न्यूझीलंडला 2015 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. 2015 वर्ल्ड कपमध्ये अंडरसनने दोन अर्धशतकं केली होती. सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने 58 रनची खेळी केली, ज्यामुळे न्यूझीलंड फायनलमध्ये पोहोचली. याशिवाय अंडरसनने 2015 वर्ल्ड कपमध्ये 16.71 च्या सरासरीने 14 विकेटही घेतल्या. मुंबईला मिळवून दिला ऐतिहासिक विजय कोरे अंडरसन याने 2014 साली आयपीएलमध्ये मुंबईला ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता. राजस्थानविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईला प्ले-ऑफमध्ये क्वालिफाय करण्यासाठी 14.4 ओव्हरमध्ये 185 रनची गरज होती. तेव्हा कोरे अंडरसनने 44 बॉलमध्या नाबाद 95 रनची वादळी खेळी केली होती. अंडरसनच्या या इनिंगमध्ये 9 फोर आणि 6 सिक्सचा समावेश होता. कोरे अंडरसनच्या या खेळीमुळे मुंबईने 14.4 ओव्हरमध्ये 184 रन करून बरोबरी केली. यानंतर आदित्य तरेने 14.5 व्या ओव्हरला सिक्स मारून मुंबईला प्ले-ऑफमध्ये पोहोचवलं. आयपीएलच्या इतिहासातला मुंबईचा हा सगळ्यात रोमांचक विजय म्हणून ओळखला जातो.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या