लँडर विक्रम शोधलात आता एवढ काम करा; IPLमधील संघाची NASAला अजब विनंती!

लँडर विक्रम शोधलात आता एवढ काम करा; IPLमधील संघाची NASAला अजब विनंती!

IPLमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू संघाने जगातील सर्वात आघाडीच्या अंतराळ संशोधन संस्थेला एक अजब चॅलेंज दिले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 डिसेंबर: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा(Nasa)ने भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ISROने पाठवलेल्या चांद्रयान -2 (Chandrayaan-2)मोहिमेतील लँडर विक्रम(Vikram Lander)चे अवशेष शोधून काढले. नासाने याचे श्रेय चेन्नई येथील इंजिनिअर शनमुगा सुब्रमण्यन(Shanmuga Subramanian) याला दिले आहे. सुब्रमण्यनने सर्वात प्रथम विक्रमला शोधून काढले होते. विक्रम लँडरचा शोध ही आज दिवसभरातील सर्वोत महत्त्वाची बातमी ठरली. नासाच्या या शोध मोहिमेनंतर आता इंडिय प्रिमअर लीग (Indian Premier League) अर्थात IPLमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू (Royal Challengers Bangalore) संघाने जगातील सर्वात आघाडीच्या अंतराळ संशोधन संस्थेला एक अजब चॅलेंज दिले आहे.

नासाद्वारे लँडर विक्रमचा शोध लागल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरूने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ISROचे अभिनंदन केले आहे आणि एक विनंती केली आहे. आमच्या संघातील फलंदाजांकडून एक विनंती आहे. नासातील ज्या टीमने लँडर विक्रमचा शोध लावला ते आमचे फलंदाज ए.बी.डिव्हिलिअर्स आणि विराट कोहली यांनी मारलेले चेंडू शोधून देतील का? RCBचा हा प्रश्न चाहत्यांना प्रचंड आवडला. हा ट्विट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

जागतिक क्रिकेटमध्ये विराट कोहलीने कर्णधार म्हणून शानदार कामगिरी केली असली तरी IPLमध्ये मात्र तो अपयशी ठरला आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली बेंगळूरू संघाला विजयाच्या जवळपास देखील पोहोचता आले नाही. गेल्या हंगामात RCBने सर्वात खराब कामगिरी करत शेवटचे स्थान मिळवले होते. संघ म्हणून RCBची कामगिरी खराब असली तरी विराट कोहली (Virat Kohli) आणि ए.बी.डिव्हिलिअर्स(Ab De Villiers) यांनी धावांचा पाऊस पाडला आहे. या दोन्ही फलंदाजांना अन्य खेळाडूंची साथ मिळत नसल्याने आयपीएलमध्ये RCBला यश मिळाले नाही. आता संघाला पुढील वर्षी होणाऱ्या हंगामात चांगली कामगिरीची अपेक्षा आहे.

भारतीय इंजिनिअरने 2 महिने आधीच शोधला लँडर विक्रम

भारताच्या चांद्रयान 2 मोहिमेत अखेरच्या क्षणी विक्रम लँडरचा संपर्क तुटला होता. हार्ड लँडिंगमुळे चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरताच विक्रमशी संपर्क तुटल्यानंतर त्याचा शोध इस्त्रो घेत होती. त्याच्याशी पुन्हा संपर्क करण्यासाठी लँडिगनंतर 14 दिवसांचा कालावधी होता. पण त्या काळात विक्रम लँडर सापडला नाही आणि त्याच्याशी संपर्कही झाला नाही. दरम्यान, आता विक्रम लँडर कुठं आहे ते शोधण्यात नासाच्या ऑर्बिटरला यश आलं आहे. विशेष म्हणजे नासाला आपण विक्रम लँडरचा फोटो काढला आहे याची कल्पनाच नव्हती. एका भारतीयानेच विक्रम लँडरचा ठावठिकाणा शोधून काढला.

नासाने भारतीय अभियंता शन्मुगा सुब्रमनियम याला विक्रम लँडर शोधण्याचं श्रेय दिलं होतं. 3 ऑक्टोबरलाच सुब्रमनियमने विक्रम लँडरचा ठावठिकाणा स्पष्टीकरणासह सांगितला होता. याबाबत नासानेही त्यांच्या संकेतस्थळावर ही गोष्ट नमूद केली आहे. शन्मुगाने दोन फोटो ट्विट केले होते. त्यापैकी एक फोटो 2017 चा होता आणि एक फोटो सध्याचा. यात त्याने नव्या फोटोत दिसणारा पांढरा ठिपका हा विक्रम लँडर असू शकतो हे असं म्हटलं होतं. त्यासाठी त्यानं इमेजचे पिक्सेल आणि विक्रम लँडरचे आकारमान याची गणितीय मांडणीही केली होती. त्याच्या आधारे हा विक्रम लँडर असण्याची शक्यता शन्मुगाने व्यक्त केली होती. त्यानंतर नासाने दोन महिन्यांनी विक्रम लँडर सापडल्याची माहिती दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2019 04:30 PM IST

ताज्या बातम्या