कॅनबेरा, 13 डिसेंबर: क्रिकेट खेळताना काही गोष्टी अचानकपणे अशा काही घडतात की त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी हे सूचत नाही. ऑस्ट्रेलियामध्ये बिग बॅश लीग (BBL ) आता सुरु झाली आहे. या स्पर्धेत जगातील अनेक दिग्गज क्रिकेटपटू सहभागी झाले आहेत. ऑस्ट्रेलियन्स फॅन्सही याचा मोठ्या प्रमाणावर आनंद घेत आहे. या लीगमध्ये शनिवारच्या मॅचमध्ये एक अजब प्रकार घडला. जो आता सर्वांच्याच लक्षात राहणार आहे.
मॅलबर्न स्टार्स विरुद्ध सिडनी थंडर्स (Melbourne Stars vs Sydney Thunder) ही मॅच सुरु असताना हा प्रकार घडला. मॅच रंगात आली होती आणि अचानक बॉल हरवला. तो बॉल कुणी सिक्स मारला म्हणून हरवला नव्हता.
कसा अडकला बॉल?
मेलबर्नच्या इनिंगमधील शेवटची म्हणजे विसावी ओव्हर सुरु होती. सिडनीकडून शेवटची ओव्हर टाकणाऱ्या डॅनियल सॅमचा सामना निक लार्किन करत होता. निकनं बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न केला. त्याचं टायमिंग चुकलं. त्यामुळे बॉल कंबरेपर्यंत उडाला आणि निकच्या जर्सीत शिरला.
बॉल जर्सीमध्ये कुठे शिरलाय याचा विचार न करता निक रन काढण्यासाठी पळाला. दुसऱ्या बाजूनं खेळत असलेल्या अॅडम झम्पानं देखील त्याला साथ दिली. मैदानातले असलेले सर्व फिल्डर्स, कॉमेंट्रेटर आणि प्रेक्षक बॉल कुठे गेला आहे हे शोधत होते. निकनं अर्धे क्रिज पार केल्यानंतर बॉल त्याच्या जर्सीमधून खाली पडला.
Hide the ball and run! Bit cheeky here from Nick Larkin...
A @KFCAustralia Bucket Moment | #BBL10 pic.twitter.com/M4T4h2l3g6
— KFC Big Bash League (@BBL) December 12, 2020
सर्वजण हसून बेजार
बॉल कुठे गायब झाला होता, हे सत्य समजल्यानंतर मैदानावरचे सर्व जण हसून बेजार झाले. या मॅचची कॉमेंट्री करत असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्ट देखील हसू आवरु शकला नाही. त्यानंतर अंपायरनं नियमाप्रमाणे त्या बॉलला ‘डेड बॉल’ घोषित केलं. या सर्व प्रकारानंतर पुढच्याच बॉलवर निक आऊट झाला. त्याने 15 रन काढले. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.