मुंबई : जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेलं बीसीसीआय (BCCI) खेळाडूंसोबतच्या कराराच्या पद्धतीमध्ये बदल करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा बदल केल्यानंतर आणखी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडू शकतो. माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय आता टी-20 खेळाडूंसोबतही करार करण्याच्या विचारात आहे. यासाठी खेळाडूने भारतासाठी कमीत कमी 10 टी-20 मॅच खेळलेल्या असाव्यात.
सध्या या खेळाडूंसोबत करार
बीसीसीआय सध्या फक्त टीम इंडियासाठी 7 वनडे आणि 3 टेस्ट मॅच खेळणाऱ्या खेळाडूंसोबत करार करते. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या प्रशासकांच्या समितीने टी-20 क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसोबत करार करायला नकार दिला होता. आता बोर्ड याबाबतीत बदल करू शकतं.
इंडियन एक्सप्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने टी-20 खेळणाऱ्या खेळाडूंसोबतही करार करण्याचा निर्णय घेतला आहे. पण हा करार वर्षभरात भारताकडून कमीत कमी 10 टी-20 खेळणाऱ्या खेळाडूंसोबतच करण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. बीसीसीआयच्या सूत्राने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना ही माहिती दिली.
बीसीसीआयने सध्या खेळाडूंना चार प्रकारच्या करारामध्ये ठेवलं आहे. ए प्लस, ए, बी आणि सी या ग्रेडमध्ये खेळाडूंची विभागणी करण्यात आली आहे. ए प्लसमध्ये असलेल्या विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह यांना सात कोटी रुपये दिले जातात. तर ए ग्रेडमध्ये असलेल्या अश्विन, भुवनेश्वर कुमार, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शिखर धवन आणि ऋषभ पंत यांना पाच कोटी रुपये मिळतात. ग्रेड बीमधल्या खेळाडूंमध्ये ऋद्धीमान सहा, उमेश यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या आणि मयंक अग्रवाल आहेत. या खेळाडूंना तीन कोटी रुपये देण्यात येतात, तर ग्रेड सी मध्ये केदार जाधव, मनिष पांडे, हनुमा विहारी, श्रेयस अय्यर, दीपक चहर, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर आहेत. या सगळ्यांना बीसीसीआय वर्षाला एक कोटी रुपये देतं.