'हे तर त्यांचं अज्ञान', बीसीसीआयचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर निशाणा

'हे तर त्यांचं अज्ञान', बीसीसीआयचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर निशाणा

बीसीसीआय (BCCI) ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) सीईओ वसीम खान यांनी केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : बीसीसीआय (BCCI) ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) सीईओ वसीम खान यांनी केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून आलेलं व्हिजाबाबतचं वक्तव्य अज्ञानातून आलं असल्याची टीका बीसीसीआयने केली आहे. 2021 साली भारतामध्ये टी-20 वर्ल्ड कप (t-20 World Cup) होणार आहे, पण पाकिस्तानी खेळाडूंना भारतात जाण्यासाठी व्हिजा मिळण्याबाबत अडचणी येऊ शकतात, असं वसीम खान म्हणाले होते. पण बीसीसीआयसोबत झालेल्या करारानुसार स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सगळ्या टीमना व्हिजा मिळेल, असं आयसीसी (ICC) ने स्पष्ट केलं आहे.

'स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सगळ्या टीमना व्हिजा मिळेल, हे स्पष्ट झाल्यानंतरच स्पर्धा ठरवण्यात आली. करारानुसार स्पर्धा भरवणाऱ्या देशाला सहभागी होणाऱ्या सगळ्या टीमना व्हिजा द्यावा लागतो, त्यानुसारच वर्ल्ड कप ठरवण्यात आला,' असं आयसीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे बीसीसीआयनेही या मुद्द्यावरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला आहे. 'पीसीबीच्या सीईओंना याबाबत काही माहितीच नाही. भारत सरकारने मागच्या वर्षीच घेतलेल्या भूमिकेमुळे तेव्हाच या गोष्टींना पूर्णविराम मिळाला होता. भारत सरकारने इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आणि इंडियन ऑलिम्पिक कमिटी यांना पत्र लिहिलं होतं. पाकिस्तान भविष्यात काही पावलं उचलणार आहे का ज्यामुळे परिस्थिती खराब होईल? आणि याबाबत वसीम खान यांना माहिती आहे का? तसं नसेल तर मग हा मुद्दाच नाही,' असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.

18 जून 2019 सालच्या पत्राचा दाखला बीसीसीआयने दिला आहे. पाकिस्तानच्या शूटरना दिल्लीतल्या वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशीपसाठी व्हिजा देण्यात आला नव्हता, त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतात आगामी स्पर्धा खेळवण्याबाबत पुनर्विचार करण्याची भूमिका घेतली. यानंतर क्रीडा सचिवांनी एक पत्र दिलं, या पत्रात कोणत्याही खेळाडूला व्हिजा देताना त्याच्या देशाची अडचण येणार नाही, हे स्पष्ट करण्यात आलं. तसंच भारतामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा व्हायला पाहिजेत, अशीच सरकारची भूमिका आहे, असंही या पत्रातून सांगण्यात आलं.

Published by: Shreyas
First published: October 21, 2020, 2:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या