कोलकाता, 28 ऑक्टोबर: खेळ कोणताही असो तो ज्या मैदानावर खेळला जातो त्याला विशेष असे महत्त्व असते. या मैदानावर अनेक विक्रम होत असतात आणि तेच मैदान अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार देखील होत असते. भारतासारख्या क्रिकेट वेड्या देशात अशी अनेक मैदाने आहेत ज्यांनी क्रिकेटला ऐतिहासिक असे क्षण दिले आहेत. भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा इडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर वर्ल्डकपमधील दोन फायनल झाल्या आहेत. यातील पहिला फायनल सामना 1987च्या वर्ल्डकपमध्ये झाला होता. त्यानंतर 2016च्या टी-20 वर्ल्डकपमधील फायनल याच मैदानावर झाला होता. याशिवाय अनेक महत्त्वाचे कसोटी सामने या मैदानावर झाले आहेत. असा ऐतिहासिक क्षणांचा साक्षिदार असलेले हे मैदान पुन्हा एकदा इतिहासात नाव नोंदण्यास सज्ज झाले आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या गुलाबी पर्वाची सुरुवात इडन गार्डन्स मैदानावरून होण्याची शक्यता आहे. हे गुलाबी पर्व म्हणजे दुसरे तिसरे काही नसून भारतीय संघ आपला पहिला डे/नाईट कसोटी(Day- Night Test) सामना इडन गार्डन्सवर खेळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)ने बांगलादेश क्रिकेट बोर्डाला 22 ते 26 नोव्हेंबर या काळात इडन गार्डन्सवर होणारा सामना डे/नाईट प्रकारात खेळण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार आम्ही यावर काम करत आहोत. पण बीसीसीआयच्या या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.
बीसीसीआयने आम्हाला डे/नाईटचा कसोटी खेळण्याचा प्रस्ताव दिला आहे. यावर आम्ही विचार करून निर्णय घेऊ. यासंदर्भातील पत्र आम्हाला 2-3 दिवसांपूर्वीच मिळाले होते. त्यावर अद्याप चर्चा झालेली नाही. आम्ही 1-2 दिवसात यावर चर्चा करून बीसीसीआयला कळवू, असे बांगलादेश बोर्डाचे चेअरमन अकमर खान यांनी ढाकामध्ये पत्रकारांना सांगितले. यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्याआधी आम्हाला क्रिकेटपटू आणि टीम समितीसोबत चर्चा करून त्यांचे मत विचारात घ्यावे लागेल. डे/नाईट कसोटीसाठी गुलाबी रंगाचा चेंडू वापरला जातो. याआधी न्यूझीलंड क्रिकेटकडून डे/नाईट कसोटीचा प्रस्ताव बांगलादेशने फेटाळून लावला होता. तेव्हा त्यांनी गुलाबी चेंडूवर खेळण्यासाठी तयारीला वेळ नसल्याचे कारण दिले होते.
भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly)याने 23 ऑक्टोबर रोजी बीसीसीआयचे अध्यक्षपद स्वीकारले होते. गांगुली स्वत: डे/नाईट कसोटी खेळण्याच्या बाजूने आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष असताना गांगुलीने जून 2016मध्ये गुलाबी चेंडूने सामना खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तेव्हा सुपर लीग फायनलमध्ये मोहन बागान विरुद्ध भवानीपूर यांच्यातील सामना गुलाबी चेंडूने खेळवण्यात आला होता. इतक नव्हे तर दुलीप चषक स्पर्धेत देखील अशाच चेंडू वापरण्यात यावा असा प्रस्ताव गांगुलीने दिला होता.
गांगुलीच्या या प्रस्तावाला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची देखील सहमती असल्याचे दिसून येते. नुकत्याच झालेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी सामना पाहण्यासाठी प्रेक्षक दिसले नाहीत. त्यामुळे भारतासारख्या देशात अशी आयडीया वापरावी लागणार आहे. विशेष म्हणजे याआधी ऑस्ट्रेलिया बोर्डाने दिलेला डे/नाईट कसोटीचा प्रस्ताव भारताने फेटाळला होता. तेव्हा कोहली आणि शास्त्रीसह प्रशासकीय समितीने बीसीसीआयचे सेक्रेटरी अमिताभ चौधरी यांचा प्रस्ताव नाकारला होता. चौधरी यांनी राजकोट येथील वेस्ट इंडिज विरुद्धचा कसोटी सामना डे/नाईट खेळण्याचा प्रस्ताव दिला होता. डे/नाईट कसोटी खेळण्याआधी गुलाबी चेंडूवर पुरेसा सराव करणे गरजेचे आहे, असे प्रशासकीय समितीचे मत आहे. याशिवाय भारतीय फिरकीपटूंना पारंपारीक चेंडूसारखी मदत गुलाबी चेंडूवर मिळणार नाही असेही काहींचे मत आहे.
बांगलादेशचा संघ 3 नोव्हेंबरपासून भारत दौऱ्यावर येत आहे. यात दौऱ्यात प्रथम 3 टी-20 सामने होणार आहेत. त्यानंतर 14 नोव्हेंबरपासून कसोटी मालिका सुरु होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh, Bangladesh vs India, Cricket, Eden gardens, Sourav ganguly