मुंबई, 28 जानेवारी : देशभरातील कोरोना परिस्थितीचा विचार करत भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (BCCI) देशांतर्गत क्रिकेटचा सिझन स्थगित केला होता. आता बीसीसीआय रणजी ट्रॉफीसह संपूर्ण सिझन पुन्हा सुरू करण्यावर विचार करत आहे. बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरूण धूमल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि सचिव जय शहा (Jay Shah) यांच्या उपस्थितीमधील बैठकीत यावर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) ही भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत 38 टीम भाग घेतात. यापूर्वीच्या वेळापत्रकानुसार 13 जानेवारी रोजी ही स्पर्धा सुरू होणार होती. पण कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली. आता रणजी ट्रॉफी स्पर्धा 2 टप्प्यात घेण्यावर विचार सुरू असल्याची माहिती धूमल यांनी दिली आहे.
' देशातील परिस्थितीचा विचार करत बीसीसीआयला फर्स्ट क्लास क्रिकेटची ही स्पर्धा स्थगित करावी लागली. बीसीसीआय 27 मार्चपासून आयपीएल स्पर्धा सुरू करत आहे. त्यामुळे एका टप्प्यात रणजी ट्रॉफी स्पर्धा घेणे शक्य नाही. पण राज्य क्रिकेट संघटनेच्या आग्रहामुळे बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी या विषयावर चर्चा केली.
आम्ही रणजी ट्रॉफी स्पर्धा खेळवण्याच्या सर्व शक्यतांचा विचार करत आहोत. आमची नियामक टीम या विषयावर काम करत आहे. पुढच्या महिन्यात या स्पर्धेचा पहिला टप्पा खेळवण्याचा विचार सुरू आहे. दुसरा टप्पा आयपीएल नंतर पूर्ण होऊ शकतो. सध्याच्या योजनेनुसार रणजी ट्रॉफीचे साखळी सामने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होतील. तर पुढचा टप्पा जून आणि जुलै महिन्यात आयोजित केला जाईल. त्यावेळी देशात मान्सून दाखल झाला असला तरी काही भागात उकाडा जास्त असतो.
रोहित-द्रविड जोडीकडून सचिनला सर्वात मोठी आशा, म्हणाला...
आम्ही स्पर्धा आयोजित करण्यासाठी उत्सुक आहोत. खेळाडूंच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड न करता ही स्पर्धा घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, ' असे धूमळ यांनी पीटीआयशी बोलताना स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.