मुंबई, 7 जून: भारतीय महिला टीम (Indian Women Team) सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. 16 जून पासून टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध एकमेव टेस्ट खेळणार आहे. या दौऱ्यासाठी 3 जून रोजी महिला टीम इंग्लंडमध्ये दाखल झाली आहे. पहिली टेस्ट सुरु होणाऱ्यापूर्वी भारतीय महिला टीमला मोठा दिलासा मिळाला आहे.
'टाईम्स ऑफ इंडिया' मधील वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी बीसीसीआयनं टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत उपविजेतेपद पटकावणाऱ्या सर्व 15 सदस्यांना त्यांच्या बक्षिसाची रक्कम दिली आहे. एक वर्षांपेक्षा जास्त कालावधीनंतर बीसीसीआयनं ही रक्कम खेळाडूंना दिली आहे. या स्पर्धेत मिळालेल्या रकमेसह दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या काही महिन्यांपूर्वी झालेल्या मालिकेतील मानधन देखील बीसीसीआयनं दिले आहे.
प्रत्येक खेळाडूला 19 लाख
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मागील महिन्यात टी 20 वर्ल्ड कप आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील रकमेचे इनव्हॉईस पाठवण्याची सूचना सर्व खेळाडूंना करण्यात आली होती. खेळाडूंकडून योग्य ती कागदपत्र मिळाल्यानंतर त्यांना पैसे देण्यात आले. टी 20 वर्ल्ड कपमधील प्रत्येक खेळाडूंना जवळपास 19 लाख रुपये मिळाल्याची माहिती आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमनं मागील वर्षी मार्च महिन्यात झालेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये फायनलमध्ये धडक मारली होती.
माध्यमांमध्ये वृत्त आल्यानंतर जाग
यापूर्वी 'टेलिग्राफ'ने महिला खेळाडूंना पैसे मिळाले नसल्याचं वृत्त दिले होते. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्सचे (FICA) सीईओ टॉप मॉफेट यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात पैसे मिळाले नसल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली. आयसीसीच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ही रक्कम खेळाडूंना मैदानातल्या कामगिरीच्या आधारावर मिळाली आहे, त्यामुळे हे पैसे द्यायला लागलेला उशीर स्वीकार करू शकत नाही. याबाबत आम्ही भारतीय खेळाडूंशीही संपर्क केला, तसंच त्यांना प्लेयर्स असोसिएशनमध्ये सहभागी होण्यासाठीही आम्ही प्रोत्साहित करत आहोत, यामुळे त्यांना जगातल्या अन्य खेळाडूंप्रमाणेच लाभ होईल.'
विराटसोबत छोले-भटूरे खाण्याची आहे 'या' ऑस्ट्रेलियन सुंदरीची इच्छा
भारत आणि पाकिस्तान ही दोनच मान्यताप्राप्त बोर्ड आहेत, जिकडे कोणत्याही प्रकारची खेळाडूंची असोसिएशन नाही. या स्पर्धेची रक्कम द्यायची जबाबदारी आयसीसीची असते, त्यामुळे स्पर्धा संपल्यानंतर एका आठवड्यात आयसीसीला ही रक्कम संबंधित बोर्डाला द्यावी लागते. आयसीसीने बीसीसीआयला ही रक्कम दिली, त्यानंतर बीसीसीआयने 14 दिवसात खेळाडूंना हे पैसे देणं गरजेचं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Cricket news