मुंबई, 8 नोव्हेंबर : कोरोना व्हायरसच्या विळख्यात आता आणखी एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सापडला आहे. बांगलादेशचा क्रिकेटपटू महमदुल्लाह (Mahmadullah) याची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे तो आता पाकिस्तान सुपर लीग (PSL)च्या प्ले ऑफमध्ये खेळणार नाही. पीएसएलच्या प्ले ऑफना 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. महमदुल्लाह ढाक्याहून पाकिस्तानला 9 नोव्हेंबरला जाणार होता. आता फक्त तमीम इकबाल हा एकमेव बांगलादेशी क्रिकेटपटू पीएसएलमध्ये खेळताना दिसेल. तमीम इकबालला लाहोर कलंदरने क्रिस लिनच्याऐवजी टीममध्ये घेतलं होतं.
महमदुल्लाहचे दोन रिपोर्ट पॉझिटिव्ह
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना महमदुल्लाह म्हणाला, 'मी दोनवेळा कोरोनाची टेस्ट केली आणि दोन्ही वेळा माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मला ताप किंवा दुसरी कोणतीही लक्षणं नाहीत. फक्त थोडी सर्दी आहे. याशिवाय कोणतीही लक्षणं नाहीत. काल मी दुसऱ्यांदा कोरोना टेस्ट केली. आता मी स्वतंत्र खोलीमध्ये आराम करत आहे. मला मुलांची आणि पत्नीची काळजी आहे. मी लवकरच बरा होईन, अशी प्रार्थना करत आहे.'
महमदुल्लाह सप्टेंबर महिन्यात झालेल्या बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या कॅम्पमध्ये सहभागी झाला होता. याशिवाय तो ट्रेनिंगही करत होता. महमदुल्लाहच्या टीमने मागच्या महिन्यात बीसीबी प्रेसिडेंट्स कपही जिंकला होता. काहीच दिवसांपूर्वी बांगलादेशी क्रिकेटपटू अबू जावेद, सैफ हसन, मशर्फे मुर्तझा यांचे कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आले होते, पण ते सगळे आता कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय बांगलादेशच्या अंडर-19 टीमचा कोचिंग स्टाफ आणि खेळाडूंनाही कोरोनाची लागण झाली होती. बांगलादेशमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 6 हजार जणांचा मृत्यू झाला आहे.