कोलकाता, 3 फेब्रुवारी : टीम इंडियाचा फास्ट बॉलर अशोक दिंडानं (Ashok Dinda) क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. 36 वर्षांच्या या फास्ट बॉलरनं भारताकडून 13 वन-डे आणि 9 T20 मॅच खेळल्या आहेत. दिंडानं 2009 साली महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) च्या कॅप्टनसीमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. दिंडानं वन-डे मध्ये 17 तर T20 मॅचमध्ये 17 विकेट्स घेतल्या. त्याला 2013 साली टीम इंडियामधून वगळण्यात आलं. त्यानंतर त्याची कधीही भारतीय टीममध्ये निवड झाली नाही.
प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दबदबा
अशोक दिंडाची आंतरराष्ट्रीय कारकीर्द लहान असली तरी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं चांगला प्रभाव पाडला. बंगलाकडून वयाच्या 21 व्या वर्षी 2005 साली त्यानं प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यानं प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये तब्बल 420 विकेट्स घेतल्या आहेत. तर लिस्ट A आणि देशांतर्गत T20 मध्ये त्याच्या नावावर प्रत्येकी 151 विकेट्स आहेत. तो बंगालचा दुसऱ्या क्रमांकाचा यशस्वी बॉलर आहे.
(हे वाचा-विराट कोहलीनंतर KKR चा हा खेळाडू बनला ‘बाबा’, मुलाचा गोंडस PHOTO केला शेअर)
अशोक दिंडानं एकूण पाच आयपीएल (IPL) टीमचं प्रतिनिधीत्व केलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, सहारा पुणे वॉरियर्स, राझिंग पुणे सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या पाच टीमकडून तो आयपीएल खेळला. आयपीएल स्पर्धेत त्यानं 78 मॅचमध्ये 69 विकेट्स घेतल्या आहे. टीम इंडियाचा सध्याचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) ही त्याची आयपीएलमधील पहिली विकेट होती.
छोट्या गावाचा स्टार!
अशोक दिंडाचं मोयना, मेदनीपूर हे गाव कोलकातापासून 3 तास अंतरावर आहे. तो 2004-05 साली कोलकातामध्ये ट्रायल देण्यासाठी आला होता. त्यावेळी कोच अटल देव बर्मन दिंडाच्या बॉलिंगनं प्रभावित झाले. त्याच्या क्रिकेट कारकीर्दीची तिथूनच सुरुवात झाली. त्यानं लवकरच बंगालच्या रणजी टीममध्ये जागा मिळवली आणि नंतर मागं वळून पाहिलं नाही.
(हे वाचा-VIDEO: धोनीच्या मुलीनं लावलं भाजीचं दुकान, आईच्या प्रश्नांना दिली गोड उत्तरं!)
दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर अॅलन डोनाल्डनं त्याची प्रशंसा केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिंडा कायम झहीर खान आणि आशिष नेहराच्या सावलीत वावरला. पण, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्यानं मोठा ठसा उमटवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket news, Team india