आयसीसी विश्वचषक स्पर्धा इंग्लंडमध्ये होणार आहे. यासाठी प्रत्येक देशाने आपआपल्या संघांची निवड आणि त्यांची घोषणा केली आहे. न्यूझीलंडने पहिल्यांदा त्यांचा संघ जाहीर केला आहे. आता अफगाणिस्तानने त्यांच्या कर्णधार असगर अफगाणला तीनही प्रकाराच्या कर्णधारपदावरून काढून टाकले आहे.
कसोटीच्या कर्णधारपदी रहमत शाहची वर्णी लागली आहे. तर उपकर्णधार म्हणून हश्मुत्तलाह शाहीदी याची निवड केली आहे.
अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला टी20 संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे. तीन कर्णधारापैकी केवळ राशिदला कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याने चार एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानचे नेतृत्व केलं आहे.
अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाणने संघासाठी चांगली कामगिरी केल्यानंतरही त्याला कर्णधारपदावरून हटवल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. असगरच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने 56 सामन्यापैकी 31 सामन्यात विजय मिळवला आहे.
अफगाणिस्तानच्या एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार 28 वर्षी गुलबदिन नैबला केलं आहे. यापूर्वी गुलबदिनला नेतृत्व करण्याचा अनुभव नाही. आता त्याला थेट इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. तर राशिद खान उपकर्णधार असणार आहे.
असगर कर्णधार असताना टी20 मध्ये 46 पैकी 37 सामने जिंकले आहेत. त्याच्याच नेतृत्वाखाली अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्ध खेळताना कसोटीतील पहिला विजय मिळवला.