Home /News /sport /

अनिल कुंबळेचं 'अर्धशतक', जम्बोचे हे स्पेल कायमच लक्षात राहतील

अनिल कुंबळेचं 'अर्धशतक', जम्बोचे हे स्पेल कायमच लक्षात राहतील

टीम इंडियाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देणारा अनिल कुंबळे (Anil Kumble) आज 50 वर्षांचा झाला आहे. भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे.

    मुंबई, 17 ऑक्टोबर : टीम इंडियाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून देणारा अनिल कुंबळे (Anil Kumble) आज 50 वर्षांचा झाला आहे. भारताकडून सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. तर टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत कुंबळे तिसऱ्या स्थानावर आहे. अनिल कुंबळेने टेस्ट क्रिकेटमध्ये 619 तर वनडे क्रिकेटमध्ये 337 बळी घेतले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये एका मॅचमध्ये 10 विकेट घेण्याची किमया त्यानी आठ वेळा केली असून इनिंगमध्ये 5 बळी घेण्याचा रेकॉर्ड त्याने 35 वेळा केला आहे. कुंबळेच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या कारकीर्दितील काही जबरदस्त खेळींवर नजर टाकूया. वेस्ट इंडिजविरुद्ध कोलकात्याची वनडे (1993) 1993 साली कोलकात्याच्या ईडन गार्डनवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये भारताने पहिले बॅटिंग करुन 50 ओव्हरमध्ये 225 रन केल्या होत्या. वेस्ट इंडिजसाठी खरंतर हे आव्हान फार कठीण वाटत नव्हतं, कारण त्यांची सुरुवात 57-1 अशी झाली होती. पण कुंबळेने 6.1 ओव्हरमध्ये 12 रन देऊन 6 विकेट घेतल्या आणि भारताला सामना जिंकवून दिला. न्यूझीलंडच्या जमिनीवर किवींना चिरडलं 1993-94 सालच्या न्यूझीलंड दौऱ्यावरही कुंबळेने टाकलेला स्पेल चाहत्यांच्या कायम लक्षात राहिल. वेलिंग्टनमध्ये झालेल्या वनडेमध्ये भारताने न्यूझीलंडला 256 रनचं आव्हान दिलं होतं. या मॅचमध्ये कुंबळेने 3.30 च्या इकोनॉमी रेटने किवींचे 5 बॅट्समन पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि भारताला 12 रननी विजय मिळवून दिला. कुंबळेनी वनडे क्रिकेट गाजवलं असलं तरीही टेस्ट क्रिकेटमधील त्याचं योगदानही जगावेगळंच आहे. कसोटीतल्या त्याच्या काही स्पेल्सवर नजर टाकूया. कारकिर्दीत पहिल्यांदाच 10 विकेट कुंबळेनी या मॅचमध्ये पहिल्यांदाच एका सामन्यात 10 विकेट घेतल्या होत्या. ही त्याची 14 वी टेस्ट मॅच होती. श्रीलंकेविरुद्धच्या या मॅचमध्ये त्याने पहिल्या इनिंगमध्ये 4 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 7 बळी घेतले. लखनऊमध्ये झालेल्या या मॅचमध्ये भारताला एकदाच बॅटिंग मिळाली. अनिल कुंबळेला या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. पाकिस्तानविरुद्धची ऐतिहासिक कामगिरी कुंबळेच्या कारकिर्दीतला हा सुवर्णाक्षरांनी लिहिण्याचा क्षण होता. दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानात पाकिस्तानविरुद्धच्या मॅचमध्ये कुंबळेने एका इनिंगमध्ये 10 विकेट घेण्याचा पराक्रम केला. जिम लेकर यांच्यानंतर असा विक्रम करणारा कुंबळे हा दुसरा खेळाडू आहे. कुंबळेच्या या कामगिरीमुळे भारताने 19 वर्षानंतर पाकिस्तानला पहिल्यांदाच धूळ चारली होती. दुसऱ्या इनिंगमध्ये 10 विकेट घेणाऱ्या कुंबळेने या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये 4 विकेट घेतल्या होत्या. सिडनीमध्ये कांगारूंना लोळवलं भारताचा 2003-04 सालचा ऑस्ट्रेलिया दौरा खऱ्या अर्थाने रोमांचक झाला. टीम इंडियाच्या जबरदस्त फॉर्ममुळे भारताने ऍडलेडच्या टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला. याच दौऱ्यातल्या सिडनी टेस्टमध्ये सचिन तेंडुलकरने 241 रनची खेळी केली. सचिनच्या कारकिर्दीतली ही सगळ्यात संयमी खेळींपैकी ही एक होती. या पूर्ण खेळीमध्ये सचिननं एकही कव्हर ड्राईव्ह मारला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ड्राईव्ह मारताना आऊट होत असल्यामुळे सचिननं तो निर्णय घेतला होता. सचिनच्या या खेळीची जगभरात चर्चा झाली असली, तरी याच मॅचमध्ये कुंबळेने एकूण 12 विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 8 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 4 बॅट्समनना माघारी पाठवलं.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या