नवी दिल्ली, 13 जुलै: वर्ल्ड कपमधील संघाच्या पराभवामुळे क्रिकेटपटू आणि चाहते नाराज आहेत. पण भारतीय क्रिकेटसाठी एक आनंद देणारी बातमी समोर आली आहे. अमेरिका क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी एका भारतीय व्यक्तीची निवड करण्यात आली आहे.
अमेरिकेच्या क्रिकेट टीमचे कोच पुबुदु दसानायके यांनी अचानक राजीनामा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका क्रिकेट बोर्ड आणि दसानायके यांचे संबंध बिघडले होते. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याचे समजते. क्रिकेट जगतात फार चर्चेत नसलेल्या या अमेरिकेच्या संघाच्या प्रशिक्षकपदी भारताचे माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष किरण मोरे यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या जून महिन्यात मोरे यांची डायरेक्टर ऑफ क्रिकेट या पदावर नियुक्त केली होती. अमेरिकेच्या संघाला मदत करण्यासाठी केवळ मोरच नाही तर आणखी दोघांची निवड करण्यात आली आहे.
अमेरिकेने मोरे यांच्या मदतीसाठी माजी क्रिकेटपटू प्रवीण आमरे आणि सुनील जोशी यांची देखील नियुक्त केली आहे. आमरे यांनी 19 वर्षा खालील भारतीय संघाचे कोच म्हणून काम केले आहे. तर जोशी यांनी बांगलादेशचे फिरकीपटूंना कोचिंग दिले आहे. मोरे यांची कोच म्हणून निवड झाल्यानंतर आता अमेरिकेच्या क्रिकेटवर मोरे यांचा प्रभाव पडणार असल्याची चर्चा आहे.
क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, मोरे यांनी गेल्याच आठवड्यात बैठका घेण्यास सुरुवात केली होती. सध्या मोरे अंतरिम कोच आहेत. पण पूर्णवेळ ही जबाबदारी सुनील जोशी यांना दिली जाणार आहे. गेल्या वर्षी अमेरिकेच्या टी-20 संघाची घोषणा करायची होती. पण मोरे आणि दसानायके यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची चर्चा होती.
VIDEO: मुंगसानं केलं 8 फूट लांब सापाचं अपहरण तुम्हीच पाहा पुढे काय झालं