मुंबई, 16 डिसेंबर : अंबाती रायुडू (Ambati Rayudu) लवकरच नव्या टीमसोबत मैदानात उतरणार आहे. मागच्यावर्षी हैदराबाद क्रिकेट असोसिएशनपासून वेगळा झाल्यानंतर रायुडू आता आंध्र प्रदेशकडून स्थानिक स्पर्धा खेळणार आहे. तेलंगणा टुडेने दिलेल्या वृत्तानुसार हैदरबादचा माजी कर्णधार राहिलेल्या रायुडूला परवानगीचं पत्र मिळाल्याचं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं आहे.
अंबाती रायुडू सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये भाग घेणार आहे. कोरोना व्हायरसमुळे लांबणीवर पडलेल्या या स्पर्धेला पुढच्या वर्षी 10 जानेवारीपासून सुरूवात होणार आहे. काही दिवसातच आंध्र क्रिकेट असोसिएशन रायुडूला टीममध्ये सामील करण्याची घोषणा करेल.
35 वर्षांचा अंबाती रायुडू दुसऱ्यांदा आंध्रकडून खेळेल, याआधी 2003, 2004 साली तो आंध्र प्रदेशकडून खेळला होता. मागच्या वर्षी वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड न झाल्यामुळे रायुडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. भारतासाठी रायुडूने 55 वनडे आणि 6 टी-20 मॅच खेळल्या. यानंतर रायुडूने निवृत्ती मागे घेतली आणि टी-20 आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबादचं प्रतिनिधीत्व केलं. हैदराबादच्या टीममध्ये सगळ्या गोष्टी ठीक सुरू नसल्याचा आरोप करत रायुडूने रणजी ट्रॉफी खेळली नव्हती.
मागच्यावर्षी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये रायुडू म्हणाला होता, टीममध्ये खूप राजकारण सुरू आहे आणि टीममधलं वातावरण चांगलं नाही. अर्जुन यादव यांना प्रशिक्षक बनवल्यानंतर रायुडूने हैदराबाद क्रिकटे असोसिएशनवरही टीका केली होती. अर्जुन हैदराबाद रणजी टीमचा प्रशिक्षक बनण्यासाठी योग्य नसल्याचं मत रायुडूने मांडलं होतं.