Home /News /sport /

'ऑस्ट्रेलियाने बीसीसीआयपुढे झुकू नये', ऍलन बॉर्डर यांचा 'त्या' निर्णयाला विरोध

'ऑस्ट्रेलियाने बीसीसीआयपुढे झुकू नये', ऍलन बॉर्डर यांचा 'त्या' निर्णयाला विरोध

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयच्या दबावापुढे झुकू नये, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू ऍलन बॉर्डर (Allan Border) यांनी केलं आहे.

    मेलबर्न, 9 ऑक्टोबर : ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने बीसीसीआयच्या दबावापुढे झुकू नये, असं वक्तव्य ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू ऍलन बॉर्डर (Allan Border) यांनी केलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियासाठी वेळापत्रकात बदल करण्यात येणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. पण हे वेळापत्रक बदलायला बॉर्डर यांनी विरोध केला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीमधली टेस्ट मॅच ही वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होते. पण ऑस्ट्रेलिया आणि भारतातली ही टेस्ट 7 जानेवारीला सुरू होणार असल्याचं सांगितलं जात आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (Cricket Australia) किंवा बीसीसीआय (BCCI) यांनी या वेळापत्रकाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. पण या दौऱ्यात पहिले वनडे मग 3 टी-20 मॅचची सीरिज आणि मग 4 टेस्ट मॅचची सीरिज होणार आहे. 17 डिसेंबरपासून सुरु होणारी टेस्ट पारंपारिक पद्धतीनुसार ब्रिस्बेनऐवजी ऍडलेडपासून सुरू होणार आहे. बॉर्डर यांनी याच निर्णयाला विरोध केला आहे. फॉक्स स्पोर्ट्स न्यूजशी बोलताना बॉर्डर म्हणाले, 'अशा पद्धतीने बदल करणं गरजेचं नाही. कोरोना व्हायरसमुळे हे बदल होत असतील, तर ठीक आहे. पण बॉक्सिंग टेस्ट आणि नवीन वर्षाच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये त्यांना विश्रांती हवी असेल, तर मात्र हे मुर्खपणाचं आहे. कित्येक वर्षांपासून आपण लागोपाठ दोन टेस्ट मॅच खेळवत आहोत. क्रिसमसची बॉक्सिंग डे टेस्ट आणि त्यानंतर लगेच नव्या वर्षात पहिली टेस्ट. प्रेक्षकांसाठी हा एक सणच असतो. पण भारतीय टीमला दोन दिवस जास्त विश्रांती हवी, म्हणून वेळापत्रक बदललं जात असेल, तर मात्र माझा याला विरोध आहे.' 'भारताकडून माईंड गेम सुरू आहे. ते स्वत:ला जागतिक क्रिकेटची ताकद समजतात. आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असल्यामुळे ते या गोष्टी बोलू शकतात. पण याच गोष्टी उलट्या झाल्या, तर आपल्याला वेळापत्रक बदलता येत नाही. आपल्यासमोर तारखा ठेवल्या जातात, आणि आपल्यालाही त्याच तारखांना खेळण्यावाचून पर्याय नसतो,' अशी टीका बॉर्डर यांनी केली आहे. 'तुम्ही वाटाघाटी करा, पण या पारंपारिक तारखा आहेत. कॅलेंडरमध्ये या तारखा आता कायम झाल्या आहेत. त्यामुळे यात वाटाघाटी करणं कठीण आहे. मी तरी यापुढे झुकणार नाही. आपल्यासाठी या ऐतिहासिक तारखा आहेत, त्यासाठी आग्रही राहूया,' असं आवाहनही बॉर्डर यांनी केलं. ब्रिस्बेनमध्ये खेळवली जाणारी टेस्ट मॅच पुढे ढकलण्यावरही बॉर्डर यांनी टीका केली. परंपरेनुसार ब्रिस्बेनमध्ये पहिली टेस्ट मॅच झाली पाहिजे. गेली कित्येक वर्ष ब्रिस्बेनपासून टेस्ट मॅचला सुरुवात होते. भारताला ब्रिस्बेनमध्ये पहिली टेस्ट मॅच खेळायची नाही, पण हे बरोबर नाही. आपण या तारखा आणि ही ठिकाणं आहेत, हे ठणकावून सांगितलं पाहिजे, असं बॉर्डर म्हणाले. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तयार केलेल्या वेळापत्रकाला ही सीरिज दाखवणाऱ्या चॅनल 7 नेही विरोध केला आहे. तसंच वार्षिक फीमध्ये कपात करा अशी मागणी त्यांनी हे वेळापत्रक पाहिल्यानंतर केली आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या