विराटनंतर आणखी एका खेळाडूची पितृत्वासाठी रजा, खेळणार नाही दुसरी टेस्ट

विराटनंतर आणखी एका खेळाडूची पितृत्वासाठी रजा, खेळणार नाही दुसरी टेस्ट

भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचनंतर (India vs Australia) पितृत्वाच्या रजेवर जाणार आहे.

  • Share this:

सिडनी, 8 डिसेंबर : भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचनंतर (India vs Australia) पितृत्वाच्या रजेवर जाणार आहे. 17 डिसेंबरला दोन्ही टीममध्ये ऍडलेडच्या मैदानात गुलाबी बॉलने डे-नाईट टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. यानंतर विराट आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी भारतात परतेल. विराटची पत्नी अनुष्का शर्मा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला बाळाला जन्म देणार आहे. कोहलीप्रमाणेच न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन (Kane Williamson) देखील पितृत्वाची रजा घेणार असल्याचं वृत्त आहे. केन विलियमसन याच महिन्यात पहिल्यांदा पिता बनणार आहे, त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये विलियमसन खेळणार नसल्याचं सांगितलं जात आहे.

केन विलियमसनने हॅमिल्टनमध्ये झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये 251 रनची खेळी केली होती. विलियमसनच्या या खेळीमुळे न्यूझीलंडचा इनिंग आणि 134 रनने विजय झाला होता. केन विलियमसनची टेस्ट क्रिकेटमधली ही सर्वोत्तम खेळी होती. मॅच संपल्यानंतर बोलताना न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले, 'विलियमसन पितृत्वाच्या रजेवर जाणार असला, तरी टीमचं संतुलन योग्य आहे. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मावेळी वडिलांचं तिकडे उपस्थित असणं महत्त्वाचं आहे. आम्ही क्रिकेट खेळतो, ते महत्त्वाचं आहे, पण केन विलियमसनचं पिता बनणं जास्त महत्त्वाचं आहे.'

11 डिसेंबरपासून दुसरी टेस्ट

वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड यांच्यातली दुसरी टेस्ट मॅच 11 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. टेस्ट सीरिज संपल्यानंतर 18 डिसेंबरपासून न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन टी-20 आणि दोन टेस्ट मॅच खेळवल्या जातील. विलियमसन यातल्या काही मॅच खेळू शकला नाही, तर त्याच्याऐवजी विल यंग खेळेल. विल यंग वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्येही खेळला होता. 5 रन करून तो आऊट झाला.

Published by: Shreyas
First published: December 8, 2020, 2:46 PM IST
Tags:

ताज्या बातम्या