मुंबई, 26 जून : वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्याच्या दरम्यान विश्रांती घेत असलेल्या दिग्गज खेळाडूंना ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन एरॉन फिंच (Aaron Finch) याने गंभीर इशारा दिला आहे. ‘या दौऱ्यातून माघार घेणाऱ्या खेळाडूंची कदाचित आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी (T20 World Cup 2021) निवड होणार नाही. कारण, निवड समिती ही फॉर्मातील खेळाडूंनाच संधी देणार आहे. ” असे फिंचने स्पष्ट केले आहे.
कोणत्या खेळाडूंना इशारा?
ऑस्ट्रेलियन टीममधील डेव्हिड वॉर्नर (David Warner), ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), पॅट कमिन्स (Pat Cummins), झाय रिचर्डसन, केन रिचर्डस, मार्कस स्टॉईनिस आणि डॅनियल सॅम्स या खेळाडूंनी आगामी दौऱ्यावर न जाण्याचा निर्णय घेतला आहे. फिंचने या सर्वांना हा इशारा दिल्याचं मानलं जात आहे.
ऑस्ट्रेलियन कॅप्टननं ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ वेबसाईटशी बोलताना सांगितले की, “निवड करताना ताजा फॉर्म पाहिला पाहिजे. जे खेळाडू चांगले खेळत आहेत, त्यांना संधी देण्यात यावी. वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्यावर जाणाऱ्या खेळाडूंना टी20 वर्ल्ड कपसाठी निवडण्यात येणाऱ्या टीममध्ये स्थान मिळवण्याची चांगली संधी आहे.”
IPL मधील सहभाग अनिश्चित
ऑस्ट्रेलियन खेळाडूंचं आयपीएल स्पर्धेच्या (IPL 2021) उत्तरार्धात खेळणे देखील अनिश्चित आहे. पॅट कमिन्सनं यापूर्वीच स्पर्धेतून माघार घेतली आहे. वॉर्नर-मॅक्सवेलच्या सहभागाबाबत अजून कोणतीही माहिती नाही. काही ऑस्ट्रेलियन खेळाडूंना टीमच्या बाहेर राहून आयपीएल स्पर्धा खेळण्याची इच्छा आहे, असे संकेत फिंचने दिले आहेत. आयपीएल स्पर्धेत भाग घेतल्यास टी20 वर्ल्ड कपपूर्वी त्यांच्यावरील प्रेशर आणखी वाढेल, असं फिंचनं सांगितलं.
इंग्लंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का, BCCI ची मागणी ECB नं फेटाळली
ऑस्ट्रेलिया करणार दोन देशांचा दौरा
टी 20 वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियाची टीम वेस्ट इंडिज आणि बांगलादेश या दोन देशांचा दौरा करणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर 5 टी20 आणि 3 वन-डे सामन्यांची मालिका होणार असून या सामन्यांची सुरुवात 10 जुलैपासून होईल. तर बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलियन टीम 5 टी20 सामने खेळणार आहे. या मालिकेची सुरुवात 5 ऑगस्टपासून होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.