लाहोर, 25 एप्रिल : भारतामध्ये कोरोना व्हायरसने (Corona Virus) थैमान घातलं आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रोज रुग्णसंख्या कमालीची वाढत आहे, तसंच मृत्यूदरही वाढला आहे. भारतासमोर आलेल्या या संकटामुळे त्यांना मदत करा, असं आवाहन पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) केलं आहे. 'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारताची स्थिती खराब झाली आहे, त्यामुळे लोकांनी मन मोठं करून मदतीसाठी पुढे यावं आणि त्यांना ऑक्सिजन टँक द्यावे,' असं शोएब अख्तर त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हणाला आहे.
'भारतात रोज कोरोनाचे जवळपास 4 लाख रुग्ण सापडत आहेत. दिल्ली आणि मुंबईसारखी मोठी शहरंदेखील कोरोनाच्या संकटात सापडली आहेत. कोणत्याही सरकारसाठी सध्याची परिस्थिती हाताळणं एकट्याला शक्य नाही. मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी भारताच्या मदतीसाठी पुढे यावं. त्यांना खूप ऑक्सिजन टँकची गरज आहे. भारतासाठी फंड गोळा करण्यासाठी मदत करा,' असं वक्तव्य शोएबने केलं.
'या महामारीमध्ये आपण सगळ्यांनी एकत्र येऊन भारताची मदत केली पाहिजे, ते आपले भाऊ-बहिण आहेत. तिथले वृद्धही आमचेच आहेत. सगळ्यांना मदतीची गरज आहे. भारत, पाकिस्तान आणि जगातल्या मुस्लिमांना मी आवाहन करतो की त्यांनी रमजानच्या या पाक महिन्यात भारताला मदत करण्यासाठी हात पुढे करा. मी मनापासून तुमच्यासाठी प्रार्थना करतो, कारण माझ्या ओळखीचे अनेक जण, माझे मित्र भारतात आहेत, ज्यांना कोरोना झाला आहे. त्यांना मदतीची गरज आहे,' अशी प्रतिक्रिया शोएबने दिली.
India is really struggling with Covid-19. Global support needed. Health care system is crashing. Its a Pandemic, we are all in it together. Must become each other's support. Full video: https://t.co/XmNp5oTBQ2#IndiaNeedsOxygen #COVID19 pic.twitter.com/vX1FCSlQjs
— Shoaib Akhtar (@shoaib100mph) April 23, 2021
भारतात मागच्या 24 तासात 2,767 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या आकड्यांनी 24 तासात होणाऱ्या मृत्यूंची सगळी रेकॉर्ड मोडली आहेत. तर भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 1 कोटी 69 लाख 60 हजार 172 झाली आहे. मागच्या 24 तासात कोरोनाचे 3,49,691 रुग्ण सापडले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 1 कोटी 40 लाख 85 हजार 110 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या देशात 26 लाख 82 हजार 751 एक्टिव्ह रुग्ण आहेत, तर आतापर्यंत एकूण 1 लाख 92 हजार 311 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Cricket, India, Shoaib akhtar