कोरोनाचा हाहाकार! दिग्गज खेळाडूंना लागण, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

कोरोनाचा हाहाकार! दिग्गज खेळाडूंना लागण, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू

जगातील काही दिग्गज खेळाडूंनाही कोरोना झाल्याचं समोर आलं असून यातील एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मार्च : कोरोनाने जगभरात हाहाकार उडाला आहे. याची धास्ती प्रत्येक देशाने घेतली आहे. आतापर्यंत 5 हजार जणांना प्राण गमावावे लागले आहेत. अमेरिकेत आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन रद्द करण्यात आलं तर काही स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या. दरम्यान, जगातील काही दिग्गज खेळाडूंनाही कोरोना झाल्याचं समोर आलं असून यातील एका खेळाडूचा मृत्यू झाला आहे.

कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांमध्ये फुटबॉलपटूंचा समावेश सर्वाधिक आहे. यातील एका महिला फुटबॉलपटूचा मृत्यू झाला. इराणची महिला फुटबालपटू इलहम शेखी हिचा 27 फेब्रुवारीला मृत्यू झाला. इराणची राजधानी तेहरानपासून 150 किमी अंतरावर कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यात आतापर्यंत 50 जणांचा जीव गेला आहे.

चीननंतर सर्वाधिक वेगानं कोरोना इटलीमध्ये पसरत आहे. इटलीचा फुटबॉलपटू कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. युवेंटस् क्लबकडून खेळणारा डेनियल रुगानी सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. रुगानीला कोरोना झाल्यानंतर खळबळ माजली होती. दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोसह अनेक खेळाडू युवेंटस् कडून खेळतात. इतर सर्व खेळाडू तंदुरुस्त असल्याचंही समोर आलं आहे.

इंग्लिश प्रीमियर लीगवरसुद्धा कोरोनाचा परिणाम झाल आहे. प्रसिद्ध फुटबॉल क्लब चेल्सीचा विंगर कॅलमला कोरोना झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तो मैदानात आला नाही. त्याच्यावर उपचार सुरु असून आणखी एका सहकारी खेळाडूला कोरोना झाला आहे.

इटलीच्या सीरी ए लीगमध्ये खेळणाऱ्या आणखी एका खेळाडूला कोरोना झाला आहे. सॅम्पडोरियाचा स्ट्रायकर मनोलो गाबिदिनीला कोरोना झाल्याचं निदान 12 मार्चला झालं. फक्त तोच नाही तर आणखी चार खेळाडू कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. इटलीत आतापर्यंत 1 हजार पेक्षा जास्त लोकांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.

दक्षिण कोरियातही कोरोना पसरला आहे. इथंही फुटबॉलपटू सुक ह्यून-जुनला कोरोना झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची तब्येत ठीक नसल्यानं चाचणी केली असता त्याला कोरोना झाल्याचं समोर आलं. कोरोना जगभर पसरला असला तरी युरोपीय देशांमध्ये जास्त आहे. आशियाई देशांमध्येही कोरोनाचे प्रमाण वाढत चाललं आहे.

हे वाचा : टीम इंडियाने घेतला कोरोनाचा धस्का, मास्क घालून फिरतेय विराटसेना

दरम्यान, कोरोनामुळे अनेक स्पर्धा रिकाम्या मैदानात भरवल्या जात आहेत. न्यूझीलंड- ऑस्ट्रेलिया मालिका प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात आली. त्यानंतर आता आयपीएल 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तर भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका रद्द करण्यात आली. जगभरातील क्रीडा स्पर्धांवर याचा परिणाम झाला आहे.

हे वाचा : क्रिकेटविश्वाला फटका! IPL खेळणाऱ्या गोलंदाजाला कोरोनाचा धोका

First published: March 15, 2020, 9:45 AM IST

ताज्या बातम्या