Home /News /sport /

News18 Exclusive : 'विराट नसतानाही रोहितने...', सौरव गांगुलीचं सूचक विधान

News18 Exclusive : 'विराट नसतानाही रोहितने...', सौरव गांगुलीचं सूचक विधान

विराट कोहलीला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर (Virat Kohli Sacked) मोठा वाद सुरू झाला आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने या वादावर प्रतिक्रिया दिली आहे.

    मुंबई, 11 डिसेंबर : विराट कोहलीला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर (Virat Kohli Sacked) मोठा वाद सुरू झाला आहे. टी-20 वर्ल्ड कपआधीच (T20 World Cup) आपण या फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं विराटने जाहीर केलं होतं, पण बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) विराटला टी-20 कॅप्टन्सी न सोडण्याची विनंती केली होती, पण विराटने दादाची ही विनंती मान्य केली नाही. निवड समितला मर्यादित ओव्हरसाठी एकच कॅप्टन ठेवायचा होता, त्यामुळे रोहित शर्माला (Rohit Sharma) वनडे टीमचंही नेतृत्व देण्यात आल्याचं गांगुलीने दोन दिवसांपूर्वी सांगितलं होतं. यानंतर आता गांगुलीने सीएनएन न्यूज 18 ला एक्सक्ल्युझिव्ह मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये गांगुलीने कॅप्टन्सीच्या मुद्द्यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. 'रोहित शर्मा हे आव्हान स्वीकारण्यासाठी तयार आहे, म्हणूनच निवड समितीने त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे. विराट कोहली ही आमची मोठी ताकद आहे, पण विराट नसतानाही रोहितने भारताला ट्रॉफी जिंकवून दिल्या आहेत. मी स्वत: विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी न सोडण्याचा सल्ला दिला होता. सततचं क्रिकेट आणि तणावामुळे त्याने टी-20 टीमचं नेतृत्व सोडलं, पण आम्हाला मर्यादित ओव्हरसाठी एकच कर्णधार हवा होता. भविष्यात काय होईल, याबाबत मला माहिती नाही. चांगल्या टीममध्ये फार कर्णधार नसतात,' असं सूचक वक्तव्य गांगुलीने केलं. 'ही भारतीय टीम नक्कीच चांगली कामगिरी करेल आणि वेगळ्या उंचीवर जाईल. पुढच्या 10 वर्षांमध्ये 9 आयसीसी स्पर्धा होणार आहेत, यातल्या बऱ्याच स्पर्धांमध्ये टीम ट्रॉफी जिंकेल,' असा विश्वास गांगुलीने व्यक्त केला आहे. तसंच दादाने टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडलाही शुभेच्छा दिल्या आहेत. आम्ही द्रविड, विराट आणि रोहित यांना हवी ती मदत करायला आणि पाठिंबा द्यायला तयार आहोत, असं विधान गांगुलीने केलं. 'आम्ही कोरोनाचं आव्हान मागे टाकलं आहे, पुढच्या वर्षी आयपीएल भारतामध्येच खेळवली जाईल, अशी आशा आहे. ओमायक्रॉनबाबत सध्या तरी काळजी करण्याची गरज नाही,' असंही गांगुली म्हणाला. 'पिंक बॉल टेस्ट हे क्रिकेटचं भविष्य आहे, त्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणावर अशा टेस्ट खेळवल्या जातील,' असंही गांगुलीने सांगितलं. प्रत्येक काम कार्यकाळासोबतच येतं, त्यामुळे काम झाल्यानंतर मीदेखील पुढे जाणार. मागच्या अधिकाऱ्यांनी भारतीय क्रिकेटला इथपर्यंत आणण्यासाठी चांगलं काम केलं. मी आता पूर्णपणे फिट आहे, अशी प्रतिक्रिया गांगुलीने दिली. राजकारणामध्ये एण्ट्री घेणार का? या प्रश्नावर पाहत राहा, असं उत्तर गांगुलीने दिलं.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Rohit sharma, Sourav ganguly, Virat kohli

    पुढील बातम्या