चेन्नई, 06 एप्रिल : पंजाबला 138 धावांत रोखून चेन्नईने 22 धावांनी विजय मिळवला. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईचा हा चौथा विजय आहे.चेन्नईने दिलेल्या 161 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात अडखळत झाली. दुसऱ्या षटकात ख्रिस गेल आणि मयंक अगरवाल लागोपाठ बाद झाले. गेलने 5 धावा तर मयांक शून्यावर बाद झाला. त्यानंतर लोकेश राहुल आणि सर्फराज खानने 110 धावांची भागिदारी केली. तेव्हा पंजाबला विजयाच्या आशा निर्माण झाल्या होत्या. मात्र, त्यांच्यानंतरचे फलंदाज धावा करू न शकल्याने चेन्नईने 22 धावांनी विजय मिळवला.
लोकेश राहुलचे अर्धशतक झाल्यानंतर कुग्गलेनने त्याला बाद केले. लोकेश राहुलने 1 षटकार आणि 3 चौकारासह 55 धावा केल्या. तर सर्फराज खानने 59 चेंडूत 67 धावा केल्या. यात 4 चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. त्यालाही कुग्गलेनने बाद केले. त्याआधी डेव्हिड मिलरला चहरने 6 धावांवर बाद केले. शेवटच्या षटकांमध्ये धावगती वाढल्याने पंजाबवर दबाव वाढला.
तत्पूर्वी, किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. डुप्लेसीच्या अर्धशतकाच्या जोरावर चेन्नईने 20 षटकात 3 बाद 160 धावा केल्या आणि पंजाबसमोर 161 धावांचे आव्हान ठेवले. डुप्लेसीने 38 चेंडूत 54 धावा केल्या. वॉटसनने 26 धावा केल्या. पंजाबचा कर्णधार रविचंद्रन अश्विनने 23 धावा देत 3 गडी बाद केले. रायडुने 15 चेंडूत 21 धावा केल्या तर धोनीने 23 चेंडूत 37 धावा केल्या.
मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभवानंतर महेंद्र सिंग धोनीने संघात तीन बदल केले. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध नाणेफेक जिंकून धोनीने फलंदाजीचा निर्णय घेतला. शार्दुल ठाकुर, मोहित शर्मा यांना विश्रांती दिली आहे तर दुखापतीमुळे ब्राव्हो खेळला नाही. त्यांच्या जागी फाफ डुप्लेसी, हरभजन सिंग आणि स्कॉट कुग्गलेन यांचा संघात समावेश करण्यात आला. धोनीच्या या तीनही शिलेदारांनी विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हरभजनने मयंकसह गेलला बाद करून मोठा अडसर दूर केला. तर कुग्गलेननं जम बसलेल्या फलंदाजांना बाद केले. फलंदाजीत डुप्लेसीच्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबसमोर 161 धावांचे आव्हान ठेवले होते.
चेन्नई सुपर किंग्ज : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शेन वॉटसन, अंबाती रायडु, सुरेश रैना, केदार जाधव, फाफ डुप्लेसीस, रवींद्र जडेजा, स्कॉट कुगलेइन, दीपक चहर, हरभजन सिंग, इम्रान ताहिर
किंग्ज इलेव्हन पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), केएल राहुल, ख्रिस गेल, मयंक अग्रवाल, सर्फराज खान, मनदीप सिंह, डेविड मिलर, सॅम करन, एम अश्विन, अँड्र्यू टाय, मोहम्मद शमी