Home /News /sport /

टीम इंडियाचे निवड समिती अध्यक्ष झाल्यानंतर चेतन शर्मा यांची पहिली प्रतिक्रिया

टीम इंडियाचे निवड समिती अध्यक्ष झाल्यानंतर चेतन शर्मा यांची पहिली प्रतिक्रिया

बीसीसीआय (BCCI) ने गुरुवारी टीम इंडियाच्या निवड समिती अध्यक्षपदी फास्ट बॉलर चेतन शर्मा (Chetan Sharma) यांची नियुक्ती केली.

    अहमदाबाद, 25 डिसेंबर : बीसीसीआय (BCCI) ने गुरुवारी टीम इंडियाच्या निवड समिती अध्यक्षपदी फास्ट बॉलर चेतन शर्मा (Chetan Sharma) यांची नियुक्ती केली. क्रिकेट सल्लागार समितीने पाच सदस्यीय निवड समितीमध्ये चेतन शर्मा यांच्यासोबत ऍबी कुरुविला (Abey Kuruvilla) आणि ओडिशाचा फास्ट बॉलर देबाशिष मोहंती (Debashish Mohanty) यांचीही निवड करण्यात आली. बीसीसीआयच्या 89 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या नावांची घोषणा करण्यात आली. चेतन शर्मा यांनी उत्तर विभागातून मणिंदर सिंग आणि विजय दहिया यांना मागे टाकलं. निवड समिती अध्यक्ष झाल्यानंतर 54 वर्षांचे चेतन शर्मा म्हणाले, 'भारतीय क्रिकेटची सेवा करण्याची संधी मला पुन्हा एकदा मिळाली आहे, ही सन्मानाची गोष्ट आहे. मी जास्त बोलणार नाही, माझं कामच बोलेल. मला दिलेल्या संधी बद्दल बीसीसीआयचे आभार मानतो.' ऍबी कुरुविला याला मुंबई क्रिकेट संघाच्या मोठ्या अधिकाऱ्यांचं समर्थन होतं, त्यामुळे त्याची अजित आगरकरऐवजी पश्चिम विभागातून निवड झाली. तर ओडिसाचा माजी फास्ट बॉलर देबाशिष मोहंती मागच्या दोन वर्षांपासून ज्युनियर राष्ट्रीय निवड समिती सदस्य म्हणून काम करत आहे. आता पुढची दोन वर्षच तो या निवड समितीमध्ये राहिल. या निवड समितीमध्ये आधीपासूनच सुनिल जोशी (दक्षिण विभाग) आणि हरविंदर सिंग (मध्य विभाग) यांचा समावेश आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार 5 सदस्यांमधला सर्वाधिक टेस्ट खेळणाऱ्या खेळाडू निवड समिती अध्यक्ष होतो. चेतन शर्मा यांनी 11 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये 23 टेस्ट आणि 65 वनडे खेळल्या. 1987 वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेण्याचा विक्रमही चेतन चौहान यांच्या नावावर आहे. चेतन शर्मा यांनी 16व्या वर्षी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती. 18 व्या वर्षी त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. यानंतर एका वर्षाने डिसेंबर 1983 साली चेतन शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध आपली पहिली वनडे खेळले. आगरकरचा पत्ता कट 'अजित आगरकरला मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) कडून समर्थन कधीच मिळालं नव्हतं. मुंबई टीमचा निवड समिती अध्यक्ष म्हणून आगरकरने मॅच बघितल्या नव्हत्या. तसंच ऍबी कुरुविला याला मुंबईतल्या क्रिकेट जगतातल्या प्रभावी लोकांचं समर्थन होतं. अजित आगरकर त्याच्या क्रिकेट रेकॉर्डनेही ऍबी कुरुविला याला मागे टाकू शकत नव्हता,' अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआयला दिली. नवीन निवड समिती इंग्लंडविरुद्धच्या सीरिजपासून टीमची निवड करेल. मदनलाल यांच्या अध्यक्षतेखालच्या क्रिकेट सल्लागार समितीने निवड समिती सदस्यांची नियुक्ती केली. या सल्लागार समितीमध्ये मदनलाल यांच्यासोबत आरपी सिंग आणि सुलक्षणा नायक आहेत.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या