Home /News /sport /

वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक, पण चर्चा एका सिक्सची, अशी होती चेतन शर्मांची कारकीर्द

वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक, पण चर्चा एका सिक्सची, अशी होती चेतन शर्मांची कारकीर्द

भारताचे माजी मध्यमगती बॉलर चेतन शर्मा (Chetan Sharma) यांची टीम इंडियाच्या निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे.

    मुंबई, 25 डिसेंबर : भारताचे माजी मध्यमगती बॉलर चेतन शर्मा (Chetan Sharma) यांची टीम इंडियाच्या निवड समिती अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. भारताकडून 23 टेस्ट आणि 65 वनडे खेळणारे चेतन शर्मा पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या सीरिजसाठी टीम इंडियाची निवड करतील. चेतन शर्मा यांची क्रिकेट कारकीर्द एखाद्या हिंदी चित्रपटाप्रमाणे उतार-चढाव असलेली होती. चेतन शर्मा यांच्या कारकिर्दीमध्ये ऍक्शनही होती आणि ड्रामाही. 17व्या वर्षी पदार्पण चेतन शर्मा यांचा जन्म 3 जानेवारी 1966 साली पंजाबच्या लुधियानामध्ये झाला. चेतन शर्मा यांची शरीरयष्ठी एखाद्या फास्ट बॉलरसारखी नसली, तरी त्यांचा वेग भल्या भल्या बॅट्समनना बॅकफूटवर न्यायचा. चेतन शर्मा यांना सुरुवातीचं प्रशिक्षण देशप्रेम आझाद यांनी दिलं. देशप्रेम आझाद कपिल देव आणि योगराज सिंग यांचेही प्रशिक्षक होते. वयाच्या 17व्या वर्षीच चेतन शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. चेतन शर्मा यांनी 1983 साली वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये आणि 18व्या वर्षी टेस्टमध्ये पदार्पण केलं. 1985 साली भारताने वर्ल्ड सीरिजमध्ये विजय मिळवला. त्या मॅचमध्ये चेतन शर्मा यांनी 7 ओव्हरमध्ये 17 रन देऊन 1 विकेट घेतली. तोंड लपवून फिरण्याची वेळ 1986 साली चेतन शर्मा यांच्या कारकिर्दीत असा क्षण आला, ज्यामुळे त्यांना आपल्याच देशात तोंड लपवून फिरण्याची वेळ आली. ऑस्ट्रेलिया-आशिया कपच्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होती. त्या मॅचमध्ये पाकिस्तानला शेवटच्या बॉलवर विजयासाठी 6 रनची गरज होती. चेतन शर्मा यांच्यासमोर जावेद मियांदाद बॅटिंग करत होते. तेव्हा मियांदाद यांनी शेवटच्या बॉलवर सिक्स मारून पाकिस्तानला जिंकवून दिलं. यानंतर चेतन शर्मा भारतात व्हिलन झाले. चाहत्यांच्या रोषापासून वाचण्यासाठी चेतन शर्मा यांना त्यांचा लूक बदलायला लागला होता. या कामगिरीनंतरही चेतन शर्मा यांची इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झाली. लॉर्ड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी 64 रन देऊन 5 विकेट घेतल्या. शर्मा यांच्या या कामगिरीमुळे भारताने लॉर्ड्सवर पहिल्यांदाच टेस्ट मॅच जिंकली. यानंतर बर्मिंघममध्ये त्यांनी 10 विकेट घ्यायचा विक्रम केला. चेतन शर्मा यांनी 2 टेस्टमध्ये 16 विकेट घेतल्या होत्या. वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक 1987 साली चेतन शर्मा यांनी आणखी एक विक्रम केला. नागपूरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मॅचमध्ये त्यांनी हॅट्रिक घेतली. केन रदरफर्ड, इयन स्मिथ आणि एव्हिन चॅटफिल्ड यांना चेतन शर्मा यांनी लागोपाठ तीन बॉलवर माघारी पाठवलं. वर्ल्ड कपमध्ये हॅट्रिक घेणारे चेतन शर्मा हे पहिले क्रिकेटपटू होते. वनडेमध्ये शतक चेतन शर्मा यांनी फक्त बॉलिंग नाही, तर बॅटिंगमध्येही ठसा उमटवला. 1989 साली वर्ल्ड सीरिजमध्ये त्यांनी इंग्लंडविरुद्ध धडाकेबाज शतक केलं. या मॅचमध्ये भारताला विजयासाठी 256 रनची गरज होती, चेतन शर्मा चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आले आणि त्यांनी फक्त 96 बॉलमध्ये नाबाद 101 रन केले, ज्यामुळे भारताने हा सामना 6 विकेटने जिंकला. चेतन शर्मा यांनी 1989 साली शेवटची टेस्ट खेळली, त्यावेळी त्यांचं वय फक्त 23 वर्ष होतं, तर 1994 साली वेस्ट इंडिजविरुद्ध जयपूरमध्ये चेतन शर्मा शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच खेळले.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या