'टीम इंडियाच्या जर्सीमध्ये पाहायला वडील हवे होते,' सिलेक्शननंतर क्रिकेटपटू इमोशनल

'टीम इंडियाच्या जर्सीमध्ये पाहायला वडील हवे होते,' सिलेक्शननंतर क्रिकेटपटू इमोशनल

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात उत्कृष्ट कामगिरी करणारा डावखुरा फास्ट बॉलर चेतन सकारियाची (Chetan Sakariya) श्रीलंका दौऱ्यासाठीच्या (India vs Sri Lanka) टीममध्ये निवड करण्यात आली आहे. टीममध्ये निवड झाल्यानंतर चेतन सकारिया इमोशनल झाला.

  • Share this:

मुंबई, 11 जून : श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची (Team India) निवड करण्यात आली आहे. या दौऱ्यामध्ये 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज होणार आहे. भारताचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडमध्ये असल्यामुळे नवोदितांना या टीममध्ये संधी देण्यात आली आहे. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात उत्कृष्ट कामगिरी करणारा डावखुरा फास्ट बॉलर चेतन सकारियाची (Chetan Sakariya)  श्रीलंका दौऱ्यासाठीच्या (India vs Sri Lanka) टीममध्ये निवड करण्यात आली आहे. टीममध्ये निवड झाल्यानंतर चेतन सकारिया इमोशनल झाला, तसंच मला टीम इंडियाच्या जर्सीमध्ये पाहण्यासाठी वडील हवे होते, अशी इमोशनल प्रतिक्रिया सकारियाने दिली. काहीच दिवसांपूर्वी चेतन सकारियाच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं होतं.

श्रीलंका दौऱ्यात भारतीय टीम 3 वनडे आणि 3 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे. यासाठी बीसीसीआयने (BCCI) गुरुवारी टीम इंडियाची घोषणा केली. या टीममध्ये 6 असे खेळाडू आहेत, ज्यांची पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. या टीमचं नेतृत्व शिखर धवन (Shikhar Dhawan) करणार आहे.

चेतन सकारियाला आयपीएलमध्ये (IPL 2021) राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 1.2 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. आयपीएल सुरू व्हायच्या काही दिवस आधी चेतनच्या छोट्या भावाचा मृत्यू झाला होता, तर आयपीएल स्थगित झाल्यानंतर त्याच्या वडिलांचं निधन झालं.

गुजरातमध्ये राहणाऱ्या 23 वर्षांच्या चेतनने टीम इंडियामध्ये झालेली निवड आपल्या वडिलांना समर्पित केली आहे. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये चेतन म्हणाला, 'हे सगळं पाहण्यासाठी माझे वडील या जगात पाहिजे होते. मी भारतासाठी खेळावं, असं त्यांचं स्वप्न होतं. मला त्यांची खूप आठवण येत आहे. देवाने मागच्या एक वर्षात मला खूप उतार-चढाव दाखवले. माझ्यासाठी हा प्रवास खूप भावुक होता. मी माझ्या छोट्या भावाला गमावलं, एका महिन्यानंतर मला आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळालं, पण मागच्याच महिन्यात वडील गेले. आता भारतीय टीममध्ये माझी निवड झाली.'

'जेव्हा वडिलांची तब्येत गंभीर होती, तेव्हा मी एक आठवडा त्यांच्यासोबत रुग्णालयात होतो. या नुकसानाची भरपाई कधीच होऊ शकत नाही. माझ्या आई-वडिलांनी मला क्रिकेट खेळण्याची परवानगी दिली, हे त्यांच्यासाठी आहे,' अशी प्रतिक्रिया चेतनने दिली. चेतन सध्या एमआरएफ पेस फाऊंडेशनमध्ये आपल्या बॉलिंगची धार आणखी जलद करत आहे.

भारत-श्रीलंका यांच्यात पहिली वनडे 13 जुलै, दुसरी वनडे 16 जुलै आणि तिसरी वनडे 18 जुलैला होईल. तर टी-20 सीरिज 21 जुलैपासून सुरू होईल. दुसरी टी-20 23 जुलैला आणि तिसरी टी-20 25 जुलैला होईल. हे सगळे सामने कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये होतील.

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडिया : शिखर धवन (कॅप्टन), भुवनेश्वर कुमार (व्हाईस कॅप्टन), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितिश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चहर, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया

नेट बॉलर्स : इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह, साई किशोर आणि समरजीत सिंह

Published by: Shreyas
First published: June 11, 2021, 7:30 PM IST

ताज्या बातम्या