25 एप्रिल : चेन्नई सुपरकिंग्सने पुन्हा एकदा आम्हीच इथले किंग्ज असल्याचं दाखवून दिलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिलेलं 207 धावांचा विक्रमी टार्गेट चेन्नईने अखेरच्या ओव्हरपर्यंत झुंज देऊन पार केलं. चेन्नईने पाच गडी राखून आरसीबीवर दणदणीत विजय मिळवला.
आयपीएलच्या अकराव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन बलाढ्य संघात थरारक सामना रंगला. आरसीबीने पहिले बॅटिंग करत चेन्नईला चांगलीच झुंज दिली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून डी काॅक 53 तर एबी डिव्हिलियर्सने सर्वाधिक 68 धावा केल्यात. विराट सेनेने तुफान फटकेबाजी करत चेन्नईसमोर विजयासाठी 207 धावांचं लक्ष्य दिलं.
207 धावांचा पाठलाग करत असताना चेन्नईची सुरुवात खराब राहिली. शेन वाॅटसन 7 धावा तर सुरेश रैना 11 धावा करून झटपट बाद झाले. त्यानंतर सॅम बिलियंग 9, रवींद्र जडेजा 3 धावा करून बाद झाला. पण महेंद्र सिंग धोणी आणि अंबाती रायडूने तडाखेबाज फलंदाजी करत विजय खेचून आणला. रायडूने 82 तर धोणी नाबाद 70 धावा कुटल्यात. अखेरच्या ओव्हरमध्ये धोनीने विजयी षटकार लगावत सामना खिश्यात घातला.