कोलंबो, 22 फेब्रुवारी : श्रीलंका क्रिकेट (Sri Lanka Cricket) वेस्ट इंडिज दौऱ्याआधी पुन्हा एकदा अडचणीत सापडलं आहे. श्रीलंका टीमचा बॉलिंग प्रशिक्षक चामिंडा वास (Chaminda Vaas) याने दौऱ्याच्या आधी पदाचा राजीनामा दिला आहे. 3 दिवसांआधीच 19 फेब्रुवारीला वासची बॉलिंग प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती, पण सोमवारी त्याने अचानक राजीनामा दिला. श्रीलंका क्रिकेटसोबत पैशांचा वाद झाल्यामुळे वासने राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे.
वासने राजीनामा दिल्यानंतर श्रीलंका क्रिकेटने नाराजी बोलून दाखवली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिलेल्या स्पष्टीकरणानुसार वासने श्रीलंका क्रिकेट असोसिएशनकडे आपलं मानधन वाढवण्याची मागणी केली होती, पण बोर्डाने याला नकार दिला, ज्यानंतर वासने पद सोडलं.
'वासने बॉलिंग प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर तो जाणार नाही. दौरा सुरू होण्याच्या काही तास आधीच त्याने हे पाऊल उचललं. हे खूप दुर्भाग्यपूर्ण आहे. कठीण आर्थिक परिस्थितीमध्ये वासने भत्ता वाढवण्याची मागणी केली आणि यानंतर त्याने बेजबाबदार पाऊल उचललं. श्रीलंका क्रिकेट आणि संपूर्ण देश वासचा क्रिकेटपटू म्हणून सन्मान करतं. त्याने देशासाठी खूप काही मिळवलं आहे, पण हे निराशाजनक आहे,' असं श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सांगितलं.
चामिंडा वास करारबद्ध कर्मचारी आहे, तरीही त्याने वेतनवाढीची मागणी केली. बोर्डाने ही मागणी नाकारली. वासला त्याचा अनुभव आणि योग्यतेनुसार मानधन दिलं जात होतं, असा दावा श्रीलंका क्रिकेट बोर्डाने केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.