मुंबई, 28 मे : दोन वर्ष आयपीएलच्या हंगामामधून बाहेर राहुन परतलेल्या चेन्नई सुपर किंग्सने 'यहाँ के हम सिंकदर' असल्याचं दाखवून दिलं. चेन्नईने हैदराबाद सनरायझर्सचा 8 गडी राखून दणदणीत पराभव करून आयपीएलच्या अकराव्या हंगामात 'किंग' ठरलीये.
मुंबईत आज वानखेडे स्टेडियमवर पिवळं वादळ 'याची देही याचा डोळा' अनुभवण्यास मिळाले. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि हैदराबादला पहिले बॅटिंग करण्यासाठी आमंत्रण दिले. हैदराबादची सुरूवात खराब राहिली. 13 धावांवर दुसऱ्याच षटकात श्रीत्सव गोस्वामी 5 धावा करून बाद झाला. त्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार केन विलियमसनने शानदार खेळी केली. शिखर धवन मात्र 26 धावा करून बाद झाला. त्यानंतर शाकिब हसनने विलियमसनला चांगली साथ दिली. मात्र, 47 धावा करून विलियमसन बाद झाला. नंतर आलेल्या युसूफ पठाणने नाबाद 45 धावांची तडाखेबाज फलंदाजी केली. पठाणने 25 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. दिपक हुडा 3 धावांवर झटपट बाद झाला. त्यानंतर कारोल्स ब्रथवेथटने 21 धावा करून बाद झाला. हैदराबादने निर्धारीत 20 षटकात सहा बाद 178 धावा केल्यात.
179 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चैन्नईने सावध सुरुवात केली. चौथ्या षटकात फा डू प्लेसी 10 धावा करून झटपट बाद झाला. शेन वाॅटसन आणि सुरेश रैना या जोडीने हैदराबादच्या फलंदाजाना सळो की पळो करून सोडत तडाखेबाज फलंदाजी केली. शेन वाॅटसनने 57 चेंडूत 11 चौकार आणि 8 षटकार लगावत शानदार शतक झळकावले. सुरेश रैना 32 धावांवर बाद झाला. त्यानंतर अंबाती रायडूने वाॅटसनला साथ दिली आणि वाॅटसनने विजयाचा मार्ग मोकळा करून दिला. चेन्नईने 18.3 षटकात 181 धावा करत विजय मिळवत जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे चेन्नईने तिसऱ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा