मुंबई, 10 डिसेंबर : टी-20 नंतर आता वनडे क्रिकेटमध्येही रोहित शर्माची (Rohit Sharma) टीम इंडियाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. टी-20 वर्ल्ड कपनंतर आपण या फॉरमॅटचं नेतृत्व सोडणार असल्याचं विराट कोहलीने (Virat Kohli) आधीच सांगितलं होतं, तर दक्षिण आफ्रिका दौऱ्याआधी विराटची वनडे कॅप्टन्सी काढून घेण्यात आली. आता जानेवारी महिन्यात होणाऱ्या वनडे सीरिजपासून रोहित शर्मा भारतीय वनडे टीमचा पूर्ण वेळ कॅप्टन असेल. आयपीएलमध्ये मुंबईला सर्वाधिक 5 वेळा चॅम्पियन बनवणाऱ्या रोहित शर्माने मागच्याच महिन्यात न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजपासून टी-20 टीमचं नेतृत्व स्वीकारलं होतं.
रोहित शर्मा आता वनडे आणि टी-20 टीमचा कर्णधार झाल्यानंतर आता रोहितची ब्रॅण्ड व्हॅल्यू (Rohit Sharma Brand Value) विराटपेक्षा जास्त होणार का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाला आहे. सध्या विराटची ब्रॅण्ड व्हॅल्यू (Virat Kohli Brand Value) रोहितपेक्षा कित्येक पटींनी जास्त आहे. एका रात्रीमध्ये हे बदलण्याची शक्यता तशी फारच कमी आहे. विराट कोहली हा मैदानात कायमच आक्रमक असतो, तर दुसरीकडे रोहित शर्मा त्याच्या बरोबर उलट एकदम शांत असतो. याचा परिणामही दोघांच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये दिसून येतो.
सेलिब्रिटींच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूचा अभ्यास करणारी कंपनी द डफ ऍण्ड फेल्प्सनुसार विराटची ब्रॅण्ड व्हॅल्यू 237.7 मिलियन डॉलर एवढी आहे, त्यामुळे विराट भारतातला सर्वाधिक ब्रॅण्ड व्हॅल्यू असणारा सेलिब्रिटी आहे, तर रोहित शर्मा या यादीमध्ये 17 व्या क्रमांकावर आहे. रोहित शर्मा दोन फॉरमॅटचा कॅप्टन झाल्यामुळे आता तो जाहिरातीसाठी 50 ते 80 टक्के जास्त रक्कम मागू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रोहित शर्मा सध्या एका जाहिरातीसाठी 80 लाख ते 1.25 कोटी रुपये घेतो, तर विराट यापेक्षा 4 पट जास्त पैसे मिळवतो.
स्पोर्ट्स आयटीडब्ल्यू कन्सलटिंगचे सह-संस्थापक भैरव शांथ यांच्यामते दोन्ही फॉरमॅटचा कॅप्टन झाल्यामुळे रोहितच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूला मोठा बूस्ट मिळेल, पण त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू विराट आणि एमएस धोनीएवढी व्हायची शक्यता कमी आहे. रोहित शर्मा त्याच्या करियरच्या अखेरच्या टप्प्यात टीमचा कर्णधार होत आहे, त्यामुळे त्याला कमी संधी मिळतील.
रोहित शर्माकडे सध्या ऍडिडास, इनफिनिटी लर्न, टॅग, ओकले, ग्लेनमार्क फार्मा, आयआयएफएल फायनान्स, वेगा, डॉ. ट्रस्ट, सीएट आणि आणखी काही ब्रॅण्ड आहेत. तर विराट प्युमा, ऑडी, एमआरएफ, एमपीएल, फिलिप्स, मिंत्रा, टिसॉट, टू यम, ग्रेट लर्निंग आणि इतर ब्रॅण्डचा ब्रॅण्ड ऍम्बेसेडर आहे. एमएस धोनीकडे कार्स 24, कोलगेट, भारत मेट्रीमोनी, इंडिगो पेण्ट्स, मास्टरकार्ड इंडिया, टीव्हीएस मोटर आणि आणखी काही ब्रॅण्ड्स आहेत.
'रोहित शर्मा पुढच्या वर्षी होणारा टी-20 वर्ल्ड कप आणि 2023 साली होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असेल. पुढच्या दोन वर्षांमध्ये नवे ब्रॅण्ड रोहित शर्माला मिळू शकतात,' असं भैरव शांथ म्हणाले. मुंबई इंडियन्सचा यशस्वी कर्णधार असल्यामुळेही रोहित शर्माला फायदा होऊ शकतो.
मागच्या काही वर्षांमध्ये विराट आणि धोनीने स्वत:ची ब्रॅण्ड इमेज तयार करण्यासाठी बराच वेळ घालवला. तर रोहितचा बराच काळ टीमच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये स्वत:चं स्थान पक्कं करण्यात गेला. धोनी निवृत्त झाल्यानंतरही त्याने स्वत:च्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये सातत्य ठेवलं आहे. आता विराटही धोनीप्रमाणेच त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू कायम ठेवणार का? रोहित शर्मा त्याची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढवणार का? हा प्रश्न औत्सुक्याचा ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma, Team india, Virat kohli