Home /News /sport /

Spot Fixing चा खुलासा केला तरी झालं निलंबन, ICC ची टेलरवर कारवाई, कारण...

Spot Fixing चा खुलासा केला तरी झालं निलंबन, ICC ची टेलरवर कारवाई, कारण...

आयसीसीने झिम्बाब्वेचा माजी कर्णधार ब्रेण्डन टेलर (Brendon Taylor) याचं स्पॉट फिक्सिंग (Spot Fixing) प्रकरणात साडे तीन वर्षांसाठी निलंबन केलं आहे. याचसोबत आयसीसीने (ICC) याच प्रकरणात कोकेन घेतल्यामुळे डोपिंगमध्येही एका महिन्यासाठी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 28 जानेवारी : आयसीसीने झिम्बाब्वेचा माजी कर्णधार ब्रेण्डन टेलर (Brendon Taylor) याचं स्पॉट फिक्सिंग (Spot Fixing) प्रकरणात साडे तीन वर्षांसाठी निलंबन केलं आहे. याचसोबत आयसीसीने (ICC) याच प्रकरणात कोकेन घेतल्यामुळे डोपिंगमध्येही एका महिन्यासाठी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. टेलरने आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी आचार संहितेचा भंग केला असून याचा स्वीकार केला असल्याचं आयसीसीने सांगितलं आहे. ब्रेण्डन टेलरला भारतीय व्यावसायिकाने स्पॉट फिक्सिंगची ऑफर दिली होती, पण टेलरने स्पॉट फिक्सिंग केलं नसलं तरी आयसीसीला याची माहिती उशिरा दिली, त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. आयसीसीच्या नियमानुसार खेळाडूला जर स्पॉट फिक्सिंग किंवा भ्रष्टाचार करण्याबाबत कोणी ऑफर दिली, तर याची माहिती लगेच आयसीसीच्या एण्टी करप्शन युनिटला द्यायची असते. टेलरने ही माहिती आयसीसीला सांगण्यात उशीर केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 35 वर्षांच्या टेलरने मागच्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. त्याने 205 वनडे, 34 टेस्ट आणि 45 टी-20 मॅच खेळल्या होत्या. काय आहे नेमकं प्रकरण? भारतात बोलावून आपल्याला कोकेन देण्यात आलं, याचं व्हिडिओ शूटिंग करण्यात आलं. यानंतर आपल्याला स्पॉट फिक्सिंग करण्यासाठी ब्लॅकमेल करण्यात आलं, असा दावा ब्रेण्डन टेलरने केला होता. काय म्हणाला टेलर? 'ऑक्टोबर 2019 साली भारतीय उद्योगपतीने मला स्पॉन्सरशीप आणि झिम्बाब्वेमध्ये T20 स्पर्धा लॉन्च करण्यावर चर्चेसाठी बोलावलं. भारतात प्रवासासाठी मला 15 हजार अमेरिकन डॉलर दिले जातील, असंही सांगितलं गेलं. मी या ऑफरला नकार देऊ शकत नव्हतो, पण मनात भीती होतीच. 6 महिने मला झिम्बाब्वे क्रिकेटकडून पैसे मिळाले नव्हते. तसंच भविष्यात झिम्बाब्वे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळेल का नाही, हेदेखील माहिती नव्हतं, त्यामुळे मी भारतात प्रवास करण्याचं ठरवलं.' 'भारतात पोहोचल्यानंतर चर्चा झाली, यानंतर उद्योगपती आणि त्याच्या सहकाऱ्यांनी मला रात्री जेवणासाठी नेलं. जेवणामध्ये आम्ही मद्यपान केलं आणि तेव्हाच त्यांनी मला कोकेन ऑफर केलं. तेदेखील तिकडे कोकेनचं सेवन करत होते. मीदेखील मूर्खपणा केला आणि कोकेनचं सेवन केलं.' 'दुसऱ्या दिवशी सकाळी तीच माणसं माझ्या हॉटेल रूमवर आली आणि रात्री कोकेन घेतल्याचा व्हिडिओ त्यांनी मला दाखवला. आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये स्पॉट फिक्सिंग केलं नाही, तर हा व्हिडिओ सार्वजनिक करण्यात येईल, अशी धमकी त्यांनी मला दिली. मला भीती वाटत होती, कारण 6 जण माझ्या हॉटेल रूमवर आले होते. मला माझ्या जीवाची काळजी होती.' 'मला 15 हजार अमेरिकन डॉलर देण्यात आले, तसंच हे डिपॉझिट आहे. उरलेले 20 हजार डॉलर स्पॉट फिक्सिंग केल्यावर पूर्ण होईल, असं त्यांनी मला सांगितलं. तिकडून सुटण्यासाठी मी पैसे घेतले आणि विमानाने भारत सोडला. त्यावेळी मला पैसे घ्यावे लागले, कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. तिकडून बाहेर पडण्याचा हा एकमेव मार्ग होता.' 'घरी परतल्यानंतर या घटनेचा माझ्यावर प्रचंड मानसिक आणि शारिरिक ताण आला. त्या उद्योगपतीला त्याच्या गुंतवणुकीवर परतावा हवा होता. हे प्रकरण आयसीसीला मी 4 महिन्यांनी सांगितलं. हा काळ जास्त आहे हे मला माहिती आहे, पण मला स्वत:ला आणि स्वत:च्या कुटुंबाला सुरक्षित करायचं होतं. घडलेला सगळा प्रकार मी आयसीसीला सांगितला. मी कधीच कोणत्याही प्रकारचं मॅच फिक्सिंग केलेलं नाही. आयसीसी माझ्यावर काही वर्षांची बंदी घालणार आहे. मी या कारवाईचा स्वीकार करतो. तसंच भविष्यात इतर खेळाडूंच्या बाबतीत असं काही झालं तर त्यांनी लगेच आयसीसीकडे याची तक्रार करावी,' असं टेलर त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला होता.
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या