दुबई, 27 ऑक्टोबर : काही दिवसापूर्वी, दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने खेळाडूंनी प्रत्येक सामन्याआधी गुडघ्यावर बसून ब्लॅक लाईव्हस मॅटर(Black Lives Matter) या मोहिमेला पाठिंबा द्यावा असे आदेश दिले. मात्र, दक्षिण आफ्रिकेच्या (West Indies vs South Africa) क्विंटन डिकॉकने या मोहिमेला पाठिंबा देण्यास नकार देत वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याआधी संघातून माघार घेतली. डिकॉकने वैयक्तिक कारणाचा दाखला दिला असला, तरी या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे. अशातच, वेस्ट इंडिजचा खेळाडू कायरन पोलार्डने(Kieron Pollard ) यावर प्रतिक्रिया देत वर्णद्वेषावर योग्य मत तयार होण्यासाठी शिक्षण महत्त्वाची गोष्ट असल्याचे म्हटले आहे.
वर्णद्वेषविरोधी मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी गुडघे टेकण्यास डीकॉकने नकार दिला हे मला बातम्यांमधूनच समजलंय. याबाबत नक्की काय घडसं याची माहिती नसल्याचे कायरन पोलार्डने म्हटले आहे. एखाद्या खेळाडूने वर्णद्वेषविरोधी मोहिमेला पाठिंबा देण्यास नका दिल्याची माहिती मला आत्ता तरी नाही. याबाबत मी सत्य काय आहे हे समजून घेऊनच प्रतिक्रिया देईन.
त्यामुळे आत्ताच या घडामोडींबाबत अंदाज वर्तवू नये अशी माझी विनंती आहे. मला व्यक्तीशः आणि संघाला देखील वर्णद्वेष संपावा असे वाटते. त्यासाठी आम्ही आमच्या वाट्याचा छोटासा भाग करतो आहोत. अशी प्रतिक्रीया पोलार्डने डीकॉकच्या निर्णयावर व्यक्त केली.
तसेच, या मुद्द्यावर आमची भूमिका काय आहे हे सर्वांना माहिती आहे. याबाबत नागरिक म्हणून, संघ म्हणून आम्हाला खूप प्रकर्षानं वर्णद्वेष संपावा असं वाटतंय. त्यासाठी आम्ही काम करत राहू. या मुद्द्यावर प्रत्येकाचे स्वतंत्र विचार आहेत. मला वाटतं वर्णद्वेषावर योग्य मत तयार होण्यासाठी शिक्षण महत्त्वाची गोष्ट आहे. असे मतही पोलार्डने यावेळी व्यक्त केले.
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या सामन्यातही क्विंटन डि कॉक हा एकमेव खेळाडू होता, जो गुडघ्यावर बसला नव्हता किंवा त्याने या मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी छातीवर हातही ठेवला नव्हता. यानंतर क्रिकेट दक्षिण आफ्रिकेला टीममध्ये ऐक्य नसल्याचं तसंच टीम या मोहिमेला पाठिंबा देत नसल्याचं चित्र उभं राहिल, असं वाटत होतं.
दक्षिण आफ्रिकेला आधीच वर्णद्वेषाचा इतिहास आहे, त्यामुळे बोर्डाने खेळाडूंनी मॅचआधी गुडघ्यावर बसण्याचे आदेश दिले. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेच्या या आदेशानंतर क्विंटन डिकॉकने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून वैयक्तिक कारण देत माघार घेतली. क्विंटन डिकॉकच्याऐवजी रीझा हेन्ड्रीक्सला दक्षिण आफ्रिकेने टीममध्ये निवडलं आहे.
कोणत्या गोष्टीला पाठिंबा द्यायचा हे ठरवण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तुम्ही कोणत्याही गोष्टीची सक्ती करू शकत नाही, असे डीकॉक काही काळापूर्वी म्हणाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: T20 cricket, T20 league, T20 world cup