मुंबई, 1 जून: टीम इंडियाच्या (Team India) आणखी एका खेळाडूच्या घरात कोरोनाने (Corona Virus) शिरकाव केला आहे. फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) आणि त्याची पत्नी नुपूर यांना कोरोनाची लक्षणं जाणवत आहेत. काहीच दिवसांपूर्वी भुवनेश्वरच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं होतं. तर आईची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भुवनेश्वर आणि त्याच्या पत्नीची टेस्ट करण्यात आली आहे, पण त्यांचे अजून रिपोर्ट आलेले नाहीत. ते दोघंही मेरठच्या आपल्या घरी क्वारंटाईन झाले आहेत.
भुवनेश्वर कुमारची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर तो टीम इंडियासाठी मोठा धक्का असेल. पुढच्या महिन्यात भारतीय टीम श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. टीमची घोषणा झाली नसली, तरी भुवनेश्वर टीमचा महत्त्वाचा भाग आहे. जर तो फिट झाला नाही, तर भारतीय टीममध्ये अनुभवी बॉलरची कमी जाणवेल.
इंग्लंडविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजमधून भुवनेश्वर कुमारने टीम इंडियामध्ये पुनरागमन केलं होतं. बराच काळ दुखापतीमुळे तो टीम इंडियाच्या बाहेर होता. वारंवार होणाऱ्या दुखापतीमुळे भुवनेश्वरला टेस्ट क्रिकेट खेळणार नाही, असं वृत्त काही दिवसांपूर्वी आलं होतं, पण भुवनेश्वरने या वृत्ताचं खंडन केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Cricket news, Team india