ब्रिस्बेन, 8 डिसेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (Australia vs England) यांच्यातील प्रतिष्ठेच्या अॅशेस सीरिजमधील (Ashes Series) पहिली टेस्ट ब्रिस्बेनमध्ये सुरू आहे. या सामन्यात, इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने (Ben Stokes )5 महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. मात्र मैदानात तो भावुक दिसला. मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात स्टोक्स ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर उतरला तेव्हा त्याने त्याचे दिवंगत वडील गेड स्टोक्स यांना श्रद्धांजली वाहिली. त्यापूर्वीही त्याने पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
बेन स्टोक्स काळी पट्टी बांधून फलंदाजीला आला, ज्यावर 568 असे लिहिले होते. गेल्या वर्षी 8 डिसेंबरला त्यांच्या वडिलांचे निधन झाले. गेड स्टोक्स हा रग्बी खेळाडू होता. त्याने 1982 मध्ये न्यूझीलंडकडून आंतरराष्ट्रीय सामनाही खेळला होता. त्याचा कॅप क्रमांक 568 होता. बेन स्टोक्सने आर्मबँडमध्ये वडिलांचा टोपी क्रमांक लिहिला होता. पहिला दिवस इंग्लंड आणि बेन स्टोक्स या दोघांसाठी खूपच खराब गेला. स्टोक्स केवळ 5 रन करुन माघारी परतला.
मैदानात उतरण्यापूर्वीही स्टोक्सने वडिलांच्या आठवणीत पोस्ट शेअर केली होती. बेन स्टोक्सने हा सामना सुरू होण्याच्या पूर्व संध्येला आपल्या दिवंगत वडिलांची आठवण करत एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, “काही महिन्यांपूर्वी मी मैदानात पुनरागमन करेन, असे कधीच वाटले नव्हते. उद्या (8 डिसेंबर) जेव्हा मी मैदानात उतरेन त्यावेळी ते माझ्यासाठी आश्चर्यकारक असेन. तुम्ही सोडून मला बरोबर एक वर्ष होणार आहे, मी तुमची आठवण काढत असेल. हा पूर्ण आठवडा तुम्ही माझ्यासोबत असाल.” असे त्याने पोस्टमध्ये म्हटले होते.
View this post on Instagram
बेन स्टोक्सचे वडील गेड स्टोक्स यांचे अॅशेस कसोटी मालिका 2021-22 सुरू होण्याच्या ठीक एक वर्षांपूर्वी निधन झाले होते. दीर्घ काळ कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर अखेर 65 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
बेन स्टोक्सने 6 महिने क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याने गेल्या महिन्यापासून क्वीन्सलँडच्या गोल्ड कोस्टमधील मेट्रिको स्टेडियममध्ये इंग्लंड संघासोबत सराव करायला सुरुवात केली होती.
बेन स्टोक्सने मानसिक आरोग्याच्या समस्या आणि बोटाच्या दुखापतीतून सावरण्यासाठी विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. आता ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातून तो पुनरागमन करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ashes, Ben stokes