मुंबई, 19 डिसेंबर : मागच्या काही आठवड्यांपासून विराट कोहली (Virat Kohli) चर्चेत आला आहे. टी-20 फॉरमॅटच्या कॅप्टन्सीचा राजीनामा दिल्यानंतर विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं. यानंतर विराटने पत्रकार परिषद घेत या वादावर खुलासा केला. विराटच्या या खुलाशामुळे वाद कमी व्हायच्या ऐवजी आणखीनच वाढला, कारण त्याने बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीचा दावाच खोडून काढला.
विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगण्यात आलं होतं पण तरीही तो ऐकला नाही. निवड समितीला मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटसाठी एकच कर्णधार हवा होता, त्यामुळे विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) सांगितलं. विराटने मात्र गांगुलीचा हा दावा खोडून काढला, आपल्याला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नकोस, असं सांगण्यात आलं नाही. तसंच टेस्ट टीमची निवड करण्याच्या दीड तास आधी तुला वनडे टीमचा कॅप्टन म्हणून काढून टाकण्यात आलं आहे, असं सांगण्यात आल्याचं विराट म्हणाला.
विराट कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून काढण्यासाठी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांची बऱ्याच काळापासून तयारी सुरू होती. विराटने वर्कलोडचं कारण देत टी-20 टीमचं नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला, पण टेस्ट आणि वनडे टीमच्या कर्णधारपदी आपण कायम राहू, असं विराटने स्पष्ट केलं. बीसीसीआयने मात्र दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीमची घोषणा करतानाच रोहित शर्मा (Rohit Sharma) वनडे टीमचा कर्णधार असेल, असं सांगून टाकलं.
क्रिकट्रॅकरच्या रिपोर्टनुसार विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यासाठी बीसीसीआय पदाधिकाऱ्यांची तयारी 4 महिने आधीपासूनच झाली होती, त्यामुळेच बीसीसीआयने एकामागोमाग एक कठोर निर्णय घेतले. विराटच्या नेतृत्वात आता भारतीय टीम दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरिज खेळणार आहे. या सीरिजसाठी रोहित शर्माला उपकर्णधार करण्यात आलं, पण दुखापतीमुळे रोहित टेस्ट सीरिज खेळू शकणार नाही. उपकर्णधारपदाची जबाबदारी आता केएल राहुलला देण्यात आली आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार टी-20 वर्ल्ड कपआधी (T20 World Cup 2021) विराट कोहली आणि बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, 'बैठकीमध्ये सौरव गांगुलीने कोहलीला टी-20 च्या कॅप्टन्सीवरून हटण्याबाबत सांगितलं होतं, यावेळी निवड समितीचे सदस्यही होते. गांगुलीने कोहलीला फायदा आणि नुकसानाबाबतही सांगितलं होतं, पण बीसीसीआयने याबाबत काही सांगायच्या आधीच विराटने सोशल मीडिया पोस्ट करून टी-20 टीमच्या राजीनाम्याची घोषणा केली.'
अनेक जण विराटला जास्त पॉवरफूल व्यक्ती म्हणून बघत होते. कोहलीमुळेच अनिल कुंबळेला (Anil Kumble) पदावरून राजीनामा द्यावा लागला. कोहलीने टी-20नंतर वनडेची कॅप्टन्सी न सोडून बीसीसीआयला आव्हान दिलं होतं. अखेर बोर्डाने विराटला वनडे कॅप्टन्सीवरूनही हटवलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Rohit sharma, Sourav ganguly, Team india, Virat kohli