मुंबई, 12 ऑक्टोबर : ऑक्टोबर महिना बीसीसीआयसाठी (BCCI) बराच कामाचा असणार आहे. याच महिन्यात आयपीएलच्या दोन नव्या टीम घोषित होणार आहेत, सोबतच मीडिया राईट्सचे टेंडरही जाहीर केले जाणार आहेत. 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होत आहे, याशिवाय बीसीसीआयला टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा उत्तराधिकारी शोधायचा आहे. टीम इंडियाच्या नव्या कोचच्या नियुक्तीची प्रक्रिया (New Coach Team India) याच महिन्यात सुरू होणार आहे. या आठवड्याच्या शेवटी बीसीसीआय नवीन कोच आणि सपोर्ट स्टाफच्या निवडीसाठी जाहिरात देणार आहे.
इनसाईड स्पोर्ट्सने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. 'आम्ही आधीच टीम इंडियाच्या प्रशिक्षकासाठीच्या अटी, शर्ती निश्चित केल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजआधी टीमला नवा कोच मिळेल. या आठवड्याच्या अखेरीस जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल,' असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं. न्यूझीलंडविरुद्धच्या सीरिजला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपच्या फायनलनंतर तीन दिवसांनी लगेच ही सीरिज सुरू होणार आहे.
शास्त्री पुन्हा कोच होण्यासाठी इच्छुक नाहीत
रवी शास्त्री पुन्हा एकदा टीम इंडियाचे कोच होण्यासाठी इच्छुक नाहीत, त्यांनी स्वत:च बीसीसीआयला याबाबतची माहिती दिली आहे. रवी शास्त्रींसोबतच टीम इंडियाचा सपोर्ट स्टाफही टी-20 वर्ल्ड कपनंतर नसेल. रवी शास्त्रींनंतर टीम इंडियाचा कोच कोण होणार? असा प्रश्न आहे. यासाठी काही नावंही समोर येत आहेत.
अनिल कुंबळे
बीसीसीआयचे काही सदस्य अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) संपर्कात होते, त्याने भारतीय टीमच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज करावा, असं काही सदस्यांचं म्हणणं होतं. पण कोच म्हणून कुंबळेचा अनुभव फारसा चांगला नाही. 2017 साली विराट कोहलीबाबत वाद झाल्यानंतर कुंबळेने प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. याशिवाय पंजाब किंग्सचा प्रशिक्षक असतानाही त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. कुंबळेला पुन्हा कोच व्हायची इच्छा नाही आणि बीसीसीआयचे अधिकारीही त्याला कोच करण्यासाठी इच्छुक नाहीत, असं बीसीसीआयच्या सूत्रांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला सांगितलं.
राहुल द्रविड
राहुल द्रविडने (Rahul Dravid) टीम इंडियाचा मुख्य कोच व्हावं, अशी अनेकांची इच्छा आहे, पण स्वत: राहुल द्रविड ही जबाबदारी घ्यायला तयार नाही. पण येणाऱ्या काही दिवसांमध्ये गोष्टी बदलतात का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
व्हीव्हीएस लक्ष्मण
टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणचं (VVS Laxman) नावही चर्चत आलं आहे.
टॉम मूडी
रवी शास्त्रींचा उत्तराधिकारी म्हणून बीसीसीआय परदेशी कोच आणण्याचा विचार करत आहे. या रेसमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू टॉम मूडीदेखील (Tom Moody) आहे. फॉक्स स्टारने दिलेल्या वृत्तानुसार मूडीने टीम इंडियाचा हेड कोच बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कोच होण्यासाठी मूडी अर्जही करणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI, Ravi shastri, Team india