नवी दिल्ली, 20 ऑगस्ट : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं एस श्रीसंतवर घातलेली आजीवन बंदी कमी केली असून त्याच्यावर 7 वर्षांची बंदी घातली आहे. श्रीसंतवरील बंदी 13 सप्टेंबर 2020 ला संपणार आहे. बीसीसीआयने म्हटलं आहे की, श्रीसंतवरील आजीवन बंदी सात वर्षांची करण्यात आली आहे. 13 सप्टेंबर 2013 मध्ये श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती.
बीसीसीआय लोकपाल डिके जैन यांनी म्हटलं की, आता श्रीसंतचे वय 35 वर्ष आहे. क्रिकेटपटू म्हणून त्याचा महत्त्वाचा काल निघून गेला आहे. मला वाटतं की कोणत्याही व्यावसायिक क्रिकेट किंवा बीसीसीआयसह इतर सदस्य संघात खेळण्यासाठी श्रीसंतवर घालण्यात आलेली आजीवन बंदी 7 वर्ष करणे योग्य होईल.
मार्च 2019 मध्ये श्रीसंतवरील आजीवन बंदी सर्वोच्च न्यायालयानं हटवली होती. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की, बीसीसीआयकडे कारवाई करण्याचा अधिकार आहे. श्रीसंतला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी आणि त्याची शिक्षा निश्चित करण्यासाठी 3 महिन्यांचा अवधी देण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं की, बीसीसीआयने श्रीसंतच्या बंदीवर विचार करावा. आजीवनं बंदीची शिक्षा जास्त आहे असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर श्रीसंतने म्हटलं होतं की, मी लिएंडर पेसला आदर्श मानतो. जर तो 45 व्या वर्षी ग्रँडस्लॅम खेळू शकतो, नेहरा 38 व्या वर्षी वर्ल्ड कप खेळू शकतो तर मी का नाही? मी तर फक्त 36 वर्षांचा आहे आणि माझं प्रशिक्षण सुरू आहे.
2015 मध्ये श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिलासह 36 आरोपींची पाटियाला हाउस कोर्टानं निर्दोष मुक्तता केली होती. श्रीसंतने 2005 मध्ये लंकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2006 मध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. त्याने 27 कसोटीत 87 विकेट घेतल्या आहेत. तर 53 एकदिवसीय सामन्यात 75 विकेट घेतल्या आहेत.
सोसायटीत गाडी लावताय तर सावधान, पाहा या भुरट्या चोराचा VIDEO
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: S sreesanth