नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट संघाला जिंकण्याची इर्षा मिळाली ती सौरव गांगुली कर्णधार झाल्यानंतर. गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं सुवर्णदिवस पाहिले. यात त्याला हातभार लागला तो सर्वोत्तम संघाचा. सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, व्हीव्हीएस लक्ष्मण, झहीर खान, युवराज सिंग यांसारखे युवा आणि दिग्गज क्रिकेटपटूंना बांधण्याचे काम केले ते गांगुलीनं. कट्टर क्रिकेट चाहत्यांसाठी विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांच्याआधी सर्वोत्तम जोडी कोणती असे विचारल्यास आपसुकच सचिन आणि गांगुली यांचे नाव येईल.
सचिन-गांगुली यांच्या जोडीनं एक काळ गाजवला. या जोडीनं गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. मैदानावरची ही स्टार सलामीची जोडी आता पुन्हा एकदा दिसणार आहे. पण ही जोडी क्रिकेटच्या मैदानावर नव्हे तर क्रिकेट प्रशासनात बॅटिंग करण्यास सज्ज झाली आहे. सौरव गांगुलीनं बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर क्रिकेटमध्ये नवनवे बदल कसे होतील, यासाठी प्रयत्न सुरू केले. अध्यक्ष झाल्यानंतर अगदी काही दिवसांत गांगुलीनं डे-नाईट कसोटी सामन्यांना परवानगी दिली. आता गांगुलीच्या या दादागिरीला जोड असणार आहे ती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची. क्रिकेटच्या मैदानावर विक्रमी भागिदारी करणारी ही जोडी आता युवा खेळाडूंसाठी पुन्हा एकदा भागिदारी करणार आहे.
वाचा-BCCI अध्यक्ष सौरव गांगुली शास्त्रींना लावणार कामाला, देणार नवी जबाबदारी
काही दिवसांपूर्वी सौरव गांगुलीनं राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आणि भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड याची भेट घेतली. आता गांगुली बीसीसीआयसोबत जोडण्यासाठी सचिन तेंडुलकरची भेट घेणार आहे. सौरव गांगुलीच्या मते सचिन तेंडुलकरनं युवा खेळाडूंना मार्गदर्शन करावे, यासाठी प्रयत्न करत आहे. आयएएनएलच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीत; सचिन तेंडुलकरनं युवा फलंदाजांना ट्रेनिंग देत, चॅम्पियन खेळाडू करण्यासाठी मदत करावी, अशी इच्छा गांगुलीनं व्यक्त केली.
सचिन तेंडुलकर देणार युवा खेळाडूंना ट्रेनिंग
सुत्रांनी दिलेल्या माहितीत, “सचिनला बीसीसीआयशी जोडण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळं येत्या काही काळात ऋषभ पंत, शुभमन गील आणि पृथ्वी शॉ सारख्या खेळाडूंना सचिनचे मार्गदर्शन मिळू शकते. 24 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं योगदान दिलेल्या सचिनकडून युवा खेळाडूंना मार्गदर्शन मिळत असेल तर, ही त्यांच्यासाठी पर्वणीच आहे. त्यामुळं भारत क्रिकेटच्या भविष्यासाठी हा मोठा निर्णय असणार आहे.
वाचा-पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर ‘मौका-मौका’, आज होणार भारत-पाक सामना
सचिन देणार स्पेशल ट्रेनिंग
सचिन हे काम नॅशनल क्रिकेट अकादमीसोबत करू शकतो. यामध्ये सध्या भारतकडे असलेल्या सर्वोत्तम युवा खेळाडूंची निवड करण्यात येईल. त्यानंतर सचिन तेंडुलकर त्यांना वैयक्तिक ट्रेनिंग देऊ शकतो.
वाचा-सौरव गांगुलीच्या राज्यात द्रविडच्या अडचणी आणखी वाढल्या, पुन्हा मिळाली नोटीस
VIDEO: निसर्गाची अवकृपा शेतकऱ्यांचा आक्रोश पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी