आयपीएल 2021 फायनलसाठी (IPL 2021 Final) बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) युएईमध्ये मॅच पाहण्यासाठी पोहोचले. या मॅचआधी गांगुली यांनी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातले क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केल्याचं वृत्त आहे.
दुबई, 15 ऑक्टोबर : आयपीएल 2021 फायनलसाठी (IPL 2021 Final) बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) युएईमध्ये मॅच पाहण्यासाठी पोहोचले. या मॅचआधी गांगुली यांनी भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातले क्रिकेट संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न केल्याचं वृत्त आहे. गांगुलींनी आयपीएल फायनलसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीझ राजा (Ramiz Raja) यांना आमंत्रण दिलं होतं, पण ते मॅच बघण्यासाठी आले नाहीत. या सामन्यामध्ये कोलकात्याचा कर्णधार इयन मॉर्गनने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला.
क्रिकेट पाकिस्तानने दिलेल्या वृत्तानुसार आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या बैठकीनंतर सौरव गांगुली यांनी रमीझ राजा यांना आयपीएल फायनलसाठी बोलावलं होतं. आशियाई क्रिकेट काऊन्सिलच्या बैठकीत दोन्ही देशांनी क्रिकेट संबंध मजबूत करण्यावर चर्चा केल्याचंही या वृत्तात सांगण्यात आलं आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2012 नंतर क्रिकेटची सीरिज झालेली नाही. दोन्ही टीम फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच एकमेकांविरोधात खेळतात. आयपीएलमध्येही पाकिस्तानी खेळाडूंच्या खेळण्यावर बंदी आहे.
पाकिस्तानी टीम युएईमध्ये पोहोचली
शुक्रवारी बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वात पाकिस्तानची टीम युएईमध्ये टी-20 वर्ल्ड कपसाठी पोहोचली आहे. बाबर आझम पहिल्यांदाच वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानचं नेतृत्व करत आहे. पाकिस्तानने 2009 साली टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता. तर दुसरीकडे भारताला 2007 सालचा पहिलाच टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यात यश आलं होतं. भारत-पाकिस्तान यांच्यात टी-20 वर्ल्ड कपमध्ये 5 सामने झाले, यातल्या सगळ्या सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 24 ऑक्टोबरला दोन्ही टीम पुन्हा आमने-सामने असतील.
टी-20 वर्ल्ड कपमध्ये 16 टीम सहभागी होणार आहेत. 17 ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात होईल, तर फायनल 14 नोव्हेंबरला दुबईमध्ये खेळवली जाईल. टी-20 वर्ल्ड कपचा हा 7 वा सिझन आहे. या स्पर्धेचं आयोजन पहिले भारतातच होणार होतं, पण कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा ओमान आणि युएईमध्ये होणार आहे. स्पर्धेचं आयोजन मात्र बीसीसीआयच करणार आहे.
Published by:Shreyas
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.