कोलकाता, 09 नोव्हेंबर : भारताचा युवा यष्टीरक्षक ऋषभ पंतकडे धोनीचा वारसदार म्हणून पाहिलं जात आहे. सध्या यष्टीरक्षणाची जबाबदारी पंतच्या खांद्यावर आहे. त्याच्या कामगिरीवरून टीका केली जात असताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने पंतचं समर्थन केलं आहे. पंत चांगला खेळाडू असून तो अनुभवातून शिकेल असं म्हटलं आहे. गांगुलीला विचारण्यात आलं की, यष्टीमागे महेंद्रसिंग धोनीची उणीव भासत आहे का? यावर पंत चांगला खेळाडू आहे. त्याला अजुन वेळ देण्याची गरज आहे. तो चांगला खेळ करेल आणि भारतीय संघाने गुरुवारी जबरदस्त कामगिरी केली असं उत्तर गांगुलीने दिलं.
बांगालदेशविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 26 चेंडूत 27 धावा केल्या होत्या. पंतने खराब यष्टीरक्षण आणि चुकीच्या डीआरएसच्या निर्णयामुळे संघाला फटका बसला. पहिला सामना भारताला गमवावा लागला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतानं विजय मिळवला असला तरी या सामन्यातही पंतने चूक केली. त्याने यष्टीचित केलं पण स्टम्पच्या पुढे ग्लोव्हज असल्यानं तो नो बॉल देण्यात आला. त्यानंतर पंतने धावबाद करून थोडा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी गांगुलीने सांगितले की, बांगलादेशविरुद्ध ईडन गार्डनवर 22 ते 26 नोव्हेंबर यादरम्यान होणाऱ्या डे/नाइट कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या घंटा वाजवून सामना सुरु झाल्याची घोषणा करतील. त्यांच्याशिवाय भारताचे बुद्धिबळपटू माजी वर्ल्ड चॅम्पियन विश्वनाथ आनंद आणि सध्याचा वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन यांच्याकडेही एक दिवसासाठीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
बंगाल क्रिकेट संघ त्या सर्व क्रिकेटपटूंचा सत्कार करणार आहे जे भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या 2000 मध्ये पहिल्या कसोटी सामन्यात खेळले होते. गांगुलीने या सामन्यात पहिल्यांदा कसोटी संघाचे नेतृत्व केलं होतं. त्याने सांगितलं की, या सर्व खेळाडूंशी बोलणं झालं आहे आणि दुपारी त्या सर्वांचे स्वागत करण्यात येईल. यावेळी अभिनव बिंद्रा, एमसी मेरीकोम, पीव्ही सिंधू यांच्यासह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनाही आमंत्रित करण्यात येणार असून त्यांचाही सत्कार करण्याचे नियोजन आहे.
VIDEO : काय आहे अयोध्येचा वाद? जाणून घ्या थोडक्यात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rishabh pant, Sourav ganguly