मुंबई, 30 डिसेंबर : देशभरामध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्यातच कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनने (Omicron) संकट आणखी वाढवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही देशाच्या जनतेला विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलं आहेत, तसंच महाराष्ट्रातही कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता राज्य सरकारने निर्बंध घातले आहेत. एकीकडे देशभरात कोरोना रुग्ण वाढत असतानाच बीसीसीआय (BCCI) आणखी एक क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याच्या तयारीत आहे.
9 जानेवारीपासून सुरू होणारी अंडर-16 विजय मर्चंट ट्रॉफी (Under 16 Vijay Merchant Trophy) पुढे ढकलली जाऊ शकते, असं बीसीसीआयचे सचिव जय शाह (Jay Shah) यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं आहे. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यालाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे गांगुली कोलकात्याच्या रुग्णालयात दाखल आहे.
BCCI may postpone Under-16 Vijay Merchant Trophy, scheduled to be held from January 9, over COVID concerns: BCCI Secretary Jay Shah to ANI (File pic) pic.twitter.com/17IbRqeFrl
— ANI (@ANI) December 30, 2021
जय शाह यांनी अंडर-16 विजय मर्चंट ट्रॉफी पुढे ढकलण्याचे संकेत दिल्यानंतर आता रणजी ट्रॉफीच्या आयोजनावरही संकट ओढावलं आहे. 13 जानेवारीपासून रणजी ट्रॉफी मोसमाला सुरूवात होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे रणजी ट्रॉफी रद्द करण्यात आली होती, तर त्याआधीचा मोसमही कोरोनामुळे अर्ध्यातच स्थगित करण्यात आला होता.
कोरोना व्हायरसमुळे 2020 सालची आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात आली, यानंतर 2021 आयपीएल भारतात खेळवण्यात आली, पण आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर पुन्हा दुसरा राऊंड युएईमध्येच झाला.
कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानंतर बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी आणि विजय हजारे वनडे ट्रॉफी स्पर्धा भारतातच खेळवली. तसंच यंदाची आयपीएलही भारतात खेळवण्याचा बीसीसीआयचा मानस आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये 10 टीम सहभागी होणार आहेत. यासाठी खेळाडूंचा मेगा ऑक्शन जानेवारीचा अखेरचा आठवडा किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला व्हायची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BCCI