Home /News /sport /

IPL होणार आणखी 'मोठी', BCCI समोर झुकली ICC

IPL होणार आणखी 'मोठी', BCCI समोर झुकली ICC

बीसीसीआयने (BCCI) आयसीसीच्या (ICC) प्रत्येक वर्षी एक स्पर्धा आयोजित करायला परवानगी दिली आहे. बोर्डाचा हा निर्णय दोन वर्षांपूर्वी अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) केलेल्या वक्तव्याच्या एकदम उलट आहे.

    मुंबई, 13 जून : बीसीसीआयने (BCCI) आयसीसीच्या (ICC) प्रत्येक वर्षी एक स्पर्धा आयोजित करायला परवानगी दिली आहे. बोर्डाचा हा निर्णय दोन वर्षांपूर्वी अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) केलेल्या वक्तव्याच्या एकदम उलट आहे. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयने आयपीएलसाठी (IPL) जास्त कालावधी सोडण्याच्या अटीवर आयसीसीचा हा निर्णय मान्य केला आहे. पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये 8 ऐवजी 10 टीम खेळतील, त्यामुळे आयपीएलसाठी आणखी जास्त कालावधीची गरज पडेल. 1 जूनला झालेल्या बैठकीनंतर आयसीसीने 2023 ते 2031 च्या फ्युचर टूर प्रोग्राम (FTP) ची घोषणा केली होती, त्यानुसार आयसीसी प्रत्येक वर्षी एका स्पर्धेचं आयोजन करणार आहे. क्रिकबझच्या रिपोर्टनुसार याचा विरोध करणारे बीसीसीआय, इंग्लंड क्रिकेट बोर्ड तसंच क्रिकेट ऑस्ट्रेलियाही आता यासाठी तयार झाले आहेत. 2019 सालीही आयसीसीने प्रत्येक वर्षी एक स्पर्धा खेळवण्याबाबत मत मांडलं होतं, पण तेव्हा सौरव गांगुलीने याला विरोध केला होता. फिफा प्रत्येक चार वर्षानंतर स्पर्धा खेळवते, त्यामुळे आयसीसीने या मूर्खपणापासून वाचलं पाहिजे. हा निर्णय आयसीसीला घ्यायचा आहे, पण मी बैठकीत माझं मत मांडेन, असं गांगुली म्हणाला होता. आयपीएलमध्ये सध्या 8 टीम आहेत, या टीममध्ये 52-54 दिवसात 60 मुकाबले होतात. पण जर पुढच्या मोसमात टीमची संख्या 8 वरून वाढवून 10 केली तर 94 सामने होतील. तसंच जर टीमना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आलं तर 76 मॅच खेळवाव्या लागतील. यासाठी बीसीसीआयला कमीत कमी 15 ते 20 जास्त दिवस लागतील. त्यामुळे परदेशी क्रिकेटपटू उपलब्ध करणं टीमसाठी मोठी अडचण ठरेल. या कारणामुळे बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यात सहमती झाली आहे. ब्रॉडकास्टरनीही आयसीसी आणि बीसीसीआयच्यामध्ये झालेल्या या सहमतीवर समाधान व्यक्त केलं आहे. आयपीएलचा यंदाचा मोसमत 4 मे रोजी कोरोना व्हायरसमुळे स्थगित करण्यात आला. आता उरलेले 31 सामने सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात युएईमध्ये होणार आहेत. आयसीसीच्या नव्या कॅलेंडरनुसार 2027 आणि 2031 साली वनडे वर्ल्ड कप होईल, ज्यात 14 टीम सहभागी होतील आणि एकूण 54 सामने होतील. 2003 वर्ल्ड कपप्रमाणे सुपर-6 फॉरमॅटमध्ये या दोन्ही वर्ल्ड कपचं आयोजन होईल. दोन ग्रुपमध्ये 7-7 टीम असतील, यातल्या दोन्ही ग्रुपमधल्या टॉप-3 टीम सुपर-6 मध्ये जातील. सुपर-6 नंतर सेमी फायनल आणि फायनल खेळवली जाईल. याशिवाय 2024, 2026, 2028 आणि 2030 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये 20 टीम उतरतील आणि 55 सामने खेळतील. टी-20 वर्ल्ड कपमध्ये चार ग्रुपमध्ये 5-5 टीम असतील. प्रत्येक ग्रुपच्या टॉप-2 टीम ग्रुप-8 मध्ये जातील. यानंतर सेमी फायनल आणि फायनल होईल. याशिवाय 2025 आणि 2029 साली चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाईल. आयसीसीचा हा कार्यक्रम बघता 2021 पासून ते 2031 पर्यंत प्रत्येक वर्षी आयसीसीची स्पर्धा होणार आहे. यात 50 ओव्हरचा वर्ल्ड कप, 20 ओव्हरचा वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Cricket news, Icc, Team india

    पुढील बातम्या