Home /News /sport /

BCCI Central Contracts : राहुल-पंत होणार मालामाल, रहाणे-पुजारा-पांड्याला धक्का!

BCCI Central Contracts : राहुल-पंत होणार मालामाल, रहाणे-पुजारा-पांड्याला धक्का!

बीसीसीआय (BCCI) नव्या मोसमासाठी खेळाडूंसोबत लवकरच कराराची घोषणा करू शकते. मागच्या वर्षी 4 ग्रेडमध्ये एकूण 28 खेळाडूंना स्थान देण्यात आलं होतं. यावेळीही यादीमध्ये फार बदल होण्याची शक्यता कमी आहे.

    मुंबई, 20 जानेवारी : बीसीसीआय (BCCI) नव्या मोसमासाठी खेळाडूंसोबत लवकरच कराराची घोषणा करू शकते. मागच्या वर्षी 4 ग्रेडमध्ये एकूण 28 खेळाडूंना स्थान देण्यात आलं होतं. यावेळीही यादीमध्ये फार बदल होण्याची शक्यता कमी आहे. पण केएल राहुल (KL Rahul) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) यांना प्रमोशन मिळू शकतं. तर दुसरीकडे सीनियर खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) टॉप ग्रेडमधून बाहेर व्हायची शक्यता आहे. गेल्या काही काळापासून या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बीसीसीआय खेळाडूंची A+, A, B आणि C या 4 ग्रेडमध्ये विभागणी करते. A+ मधल्या खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये, A ग्रेडमधल्या खेळाडूंना 5 कोटी रुपये, B ग्रेडमधल्या खेळाडूंना 3 कोटी रुपये आणि C ग्रेडच्या खेळाडूंना 1 कोटी रुपये दिले जातात. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह A+ मध्ये असतील. याचसोबत केएल राहुल आणि ऋषभ पंत यांनी तिन्ही फॉरमॅटमध्ये नियमित खेळाडू म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे, त्यामुळे या दोघांना प्रमोशन मिळतं का, हे पाहावं लागेल. 'मागच्या मोसमात केलेल्या कामगिरीवर करार केला जातो. बीसीसीआय आणि मुख्य कोच राहुल द्रविड यांनी रहाणे-पुजाराचा सन्मान करून त्यांना ग्रुप-एमध्ये ठेवलं तर तो वेगळा मुद्दा असेल, पण सामान्य परिस्थितीमध्ये ते ग्रुप-एमध्ये असू शकत नाहीत. याचप्रमाणे इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि हार्दिक पांड्याही (Hardik Pandya) संपूर्ण मोसमात दुखापत आणि फॉर्ममुळे संघर्ष करत होते, त्यामुळे त्यांचा ग्रुप-बीमध्ये समावेश होऊ शकतो,' असं बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं. शार्दुलचं प्रमोशन? मागच्या मोसमात ग्रुप-बीमध्ये असलेल्या शार्दुल ठाकूरने (Shardul Thakur) टेस्ट मॅचमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यालाही ग्रुप-एमध्ये प्रमोशनची अपेक्षा असेल. सध्या ग्रुप सीमध्ये मोहम्मद सिराज, शुभमन गिल आणि हनुमा विहारी आहे. नव्या खेळाडूंमध्ये व्यंकटेश अय्यर आणि हर्षल पटेल यांनाही पहिल्यांदाच करारबद्ध केलं जाऊ शकतं. मागच्या मोसमात करार झालेले खेळाडू ग्रेड A+: विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह ग्रेड A: रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, केएल राहुल, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या. ग्रेड B: ऋद्धीमान साहा, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, शार्दुल ठाकुर, मयंक अग्रवाल. ग्रेड C: कुलदीप यादव, नवदीप सैनी, दीपक चहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, अक्षर पटेल, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Team india

    पुढील बातम्या