मुंबई, 16 डिसेंबर : बीसीसीआय (BCCI) ची 89वी वार्षिक सर्वसाधारण सभा (AGM) अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर होणार आहे. या बैठकीत आयपीएल (IPL) च्या दोन नव्या टीमबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. या बैठकीची नोटीस आधीच पाठवण्यात आली आहे. आयपीएलमध्ये सध्या 8 टीम खेळतात, आणखी टीमना मंजुरी देण्यासाठी राज्य क्रिकेट संघाच्या प्रतिनिधींना मंजुरी द्यावी लागणार आहे.
बीसीसीआयचे सचिन जय शाह यांनी सगळ्या राज्यांच्या संघांना बैठकीबाबत नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये बैठकीच्या ठिकाणाची माहिती दिलेली नाही. बैठकीच्या ठिकाणाबाबत लवकरच सांगितलं जाईल, असं नोटीसमध्ये सांगण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या या बैठकीत 23 मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यामध्ये उपाध्यक्ष निवडणुकीच्या मुद्द्याचाही समावेश आहे. हे पद महिम वर्मा यांच्या राजीनाम्यानंतर खाली आहे.
याशिवाय आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या जनरल बॉडीमध्ये दोन प्रतिनिधींची निवड, एथिक्स अधिकारी, लोकपाल नियुक्ती, क्रिकेट समिती आणि स्टॅन्डिंग समिती, अंपायर समितीची स्थापना, लॉस एन्जेलिस-2028 ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटच्या समावेशावर बीसीसीआयचं धोरण, टीम इंडियाचा फ्युचर टूर प्रोग्राम, एनसीएशी संबंधित मुद्दे, पुढच्या वर्षी भारतात होणारा टी-20 वर्ल्ड कप यांचा समावेश आहे.
या बैठकीतला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आयपीएलच्या दोन नव्या टीम आणून ही स्पर्धा 10 टीमची करणे हा आहे. अडानी समूह आणि संजीव गोयंका यांची आरपीजी नव्या टीमसाठी आग्रही आहेत. यातली एक टीम अहमदाबादची असेल, असं सांगितलं जात आहे.
बीसीसीआयच्या बैठकीत आयसीसी आणि आशियाई क्रिकेट परिषदेवर बीसीसीआयचं प्रतिनिधीत्व कोण करेल, यावरही चर्चा होईल. निवड समिती अध्यक्षासोबत तीन नव्या निवड समिती सदस्यांचीही निवड होणार आहे.