...तर भ्रष्टाचार रोखण्यासाठी सट्टेबाजी अधिकृत आणि येणार मॅच फिक्सिंगचा कायदा

...तर भ्रष्टाचार रोखण्यासाठी सट्टेबाजी अधिकृत आणि येणार मॅच फिक्सिंगचा कायदा

क्रिकेट विश्वाला मॅच फिक्सिंगची किड लागली असून यामध्ये खेळाडू अडकत आहेत. गेल्या दोन दिवसांत मॅच फिक्सिंगची प्रकरणे समोर आल्यानं भविष्यात सट्टेबाजी अधिकृत केली जाण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई, 17 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट विश्वात गेल्या दोन दिवसांपासून मॅच फिक्सिंगवरून खळबळ उडाली आहे. भ्रष्टाचाराची प्रकरणे सातत्यानं समोर येत असल्यानं बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिट (एसीयू)चे प्रमुख अजित सिंग यांनी सट्टेबाजी अधिकृत करण्याचा पर्याय सुचवला आहे. राजस्थान पोलिस महासंचालक म्हणून काम केलेल्या अजित सिंग यांनी म्हटलं आहे की, मॅच फिक्सिंग कायदा आणण्याची सध्या गरज आहे. जर याच्याविरुद्ध कायदा आणला तर पोलिसांची भूमिका स्पष्ट होईल.

अजित सिंग यांना विचारण्यात आलं की, मुंबई, कर्नाटक आणि तामिळानाडुमध्ये या वर्षी मॅच फिक्सिंगची प्रकरणे समोर आल्यानंतर स्पॉट फिक्सिंग रोखणं अशक्य होईल का? यावर ते म्हणाले की, असं नाही की फिक्सिंग रोखता येणार नाही. त्यावर कठोर उपाय करण्याची गरज आहे. अजित सिंग 2018 पासून बीसीसीआयच्या अँटी करप्शन यूनिटमध्ये आहेत. त्यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत स्पॉट फिक्सिंगबद्दल खुलासा केला.

तामीळनाडु प्रीमीयर लीग आणि महिला क्रिकेटरशी संबंधित मॅच फिक्सिंगच्या प्रकऱणांची चौकशी सध्या सुरू आहे. अजित सिंग म्हणाले की, भारतीय लॉ कमिशनने गेल्या वर्षी मॅच फिक्सिंगला गुन्हा घोषित करण्याबाबत सुचवलं होतं. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियानं यावर निर्णय घेतला आहे. याशिवाय सट्टेबाजीला अधिकृत करणं हा क्रिकेटमधील भ्रष्टाचार थांबवण्याचा पर्याय होऊ शकतो. यावर विचार व्हायला हवा. असे झाल्यास सर्व व्यवसाय नियंत्रणाखाली येईल. असे करायचं झालं तर काही नियम तयार करायला हवेत.

एकदा सट्टेबाजी अधिकृत केली तर तुम्हाला माहिती होईल की कोण आणि किती सट्टेबाजी करत आहे. अशावेळी तुमच्याकडे सर्व माहिती असेल त्यामुळं अवैध सट्टेबाजीला चाप बसेल. सध्या सट्टेबाजीला शंभर ते हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. पहिल्यांदा फक्त पुरुष क्रिकेटमध्ये फिक्सिंगची माहिती होती. मात्र, आता याची धग महिला क्रिकेटपर्यंत पोहचली आहे अस अजित सिंग म्हणाले.

VIDEO: पंतप्रधान मोदींच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचं उद्घाटन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 17, 2019 02:31 PM IST

ताज्या बातम्या