ढाका, 24 मे : श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने (Dimuth Karunaratne) दुसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या दिवशी श्रीलंकेच्या (Bangladesh vs Sri Lanka) पहिल्या इनिंगला सांभाळलं आहे. बांगलादेशने पहिल्या इनिंगमध्ये 365 रन केले, ज्यानंतर दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने 2 विकेट गमावून 143 रन केले आहेत. करुणारत्ने 70 रनवर नाबाद खेळत आहे. श्रीलंका अजून 222 रनने पिछाडीवर असून त्यांच्या हातात आणखी 8 विकेट आङेत. त्याआधी बांगलादेशकडून लिटन दास आणि मुशफिकुर रहीम यांनी शतकं केली, तर इतर 6 बॅट्समन शून्य रनवर आऊट झाले. या सीरिजची पहिली टेस्ट मॅच ड्रॉ झाली आहे, त्यामुळे या सामन्यात विजय मिळवणारी टीम सीरिजही जिंकेल.
मॅचच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशने पहिली इनिंग 277/5 वर सुरू केली. लिटन दासने 246 बॉलमध्ये 141 रन केले, ज्यात 16 फोर आणि एका सिक्सचा समावेश होता. मुशफिकुर रहीम आणि लिटन दास यांच्यात 272 रनची पार्टनरशीप झाली, पण बांगलादेशने 24 रनमध्येच 5 विकेट गमावल्या. लिटन आऊट झाल्यानंतर मोसादक हुसैनही त्याच ओव्हरमध्ये शून्य रनवर आऊट झाला.
यानंतर इबादत हुसैन आणि खालिद अहमदही शून्य रन करूनच पॅव्हेलियनमध्ये परतले. ताजुल इस्लामने 15 रन केले, पण रहीने नाबाद 175 रन करून टीमचा स्कोअर 350 पर्यंत नेला. मुशफिकुर रहीमच्या 355 बॉलच्या या मॅरेथॉन खेळीमध्ये 21 फोरचा समावेश होता. मॅचच्या पहिल्या दिवशी महमदुल्लाह, तमीम इक्बाल आणि शाकिब अल हसनही शून्य रनवर आऊट झाले होते. टेस्ट इतिहासात पहिल्यांदाच एका इनिंगमध्ये टीमने 2 शतकं केली आणि त्यांचे 6 बॅट्समन शून्य रनवर आऊट झाले.
बांगलादेशची इनिंग संपल्यानंतर बॅटिंगला आलेल्या श्रीलंकेने चांगली सुरूवात केली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 95 रनची पार्टनरशीप केली. फर्नांडो 91 बॉलवर 57 रन करून आऊट झाला. कुशल मेंडिसला फक्त 11 रन करता आले. करुणारत्ने 127 बॉलमध्ये 70 रनवर नाबाद आहे, यात त्याने 7 फोर मारल्या आहेत. करुणारत्नेसोबत रजिता शून्य रन करून क्रीजवर आहे. ही सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bangladesh, Sri lanka, Test cricket