ढाका, 19 डिसेंबर : भारताने रविवारी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Asian Champions Trophy) जपानचा 6-0 ने दारूण पराभव केला आहे. स्पर्धेच्या राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये भारतीय टीमचा एकही पराभव झालेला नाही. जपानविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीत सिंगने दोन गोल केले, तर दिलप्रीत सिंग, जरमनप्रीत सिंग, सुमित आणि शमशेर सिंग यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला.
भारताचा या स्पर्धेतला हा लागोपाठ तिसरा विजय आहे. स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात कोरियाने भारताविरुद्धचा सामना ड्रॉ केला होता, पण मनप्रीत सिंगच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीमने बांगलादेशचा 9-0 ने पराभव केला, यानंतर पाकिस्तान आणि जपानला धूळ चारली. या कामगिरीमुळे भारताने सेमी फायनलमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. सेमी फायनलमध्ये भारताची लढत कोणाशी होईल, हे मात्र अजून निश्चित झालेलं नाही. पाच देशांच्या या स्पर्धेत भारत 10 पॉईंट्सह पहिल्या क्रमांकावर आहे. यानंतर कोरिया (6), जपान (5), पाकिस्तान (2) आणि बांग्लादेश (0) आहे.
लागोपाठ तीन विजयांमुळे भारतीय टीमचं मनबल आणि आत्मविश्वास उंचावर आहे. भारतीय टीमन आशियाई खेळांमध्ये गोल्ड मेडल मिळवणाऱ्या जपानचा जोरदार पराभव केला. सामन्यात भारताने सुरुवातीपासूनच पकड बनवली. सामन्याचा पहिला हाफ भारताच्या बाजूने होता. पहिल्या क्वार्टरच्या 6 मिनिटांमध्येच भारताने पेनल्टी कॉर्नर मिळला, पण गोल करण्यात टीमला अपयश आलं.
जपानविरुद्धच्या मॅचमध्ये भारतीय टीमने आक्रमक खेळ सुरू ठेवला. याचा फायदा टीमला झाला. हार्दिक सिंगच्या पासवर हरमनप्रीत सिंगनेभारताला पहिला गोल मिळवून दिला. ललित उपाध्यायने गोलची सोपी संधी सोडली नसती तर पहिल्याच क्वार्टरमध्ये भारताचा स्कोअर 2-0 झाला असता. 23 व्या मिनिटाला दिलप्रीतने गोल करून भारताची आघाडी आणखी वाढवली. यानंतर भारताने आणखी चार गोल केले आणि जपानविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.